मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत मुंबईतही गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या गट क प्रवर्गातील गोंधळ आता पुणे नाशिकनंतर मुंबईत पोहोचला आहे. नर्सिंग आणि पॅरामेडीकलचा पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे.
सील फुटलेला पेपर पाहून विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला आहे. शेकडो विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेरच ठिय्या आंदोलन केलं आहे. परीक्षा सध्या थांबवल्याची प्राथमिक माहिती आहे. दुपारच्या सत्रातील पेपरची वेळ ३ ते ५ अशी वेळ होती. मात्र, काही विद्यार्थ्यांनी अडीज वाजताच व्हॉटसअॅपर पेपर आल्याचा दावा केलाय. सध्या परीक्षा केंद्रावर प्रचंड तणाव आणि गोंधळ निर्माण झाला असून पोलीस आणि परिक्षार्थी आमने सामने आले आहेत.
मुंबईतील परेरा वाडी साकीनाका अंधेरी इथल्या शिवेनरी विद्या मंदिरात आरोग्य विभागाचा पेपर होणार होता. यापूर्वी हॉल तिकीट आणि सेंटर बदलल्यानं विद्यार्थी हैराण होते. पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर १० ची वेळ देण्यात आलेली असताना तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याचं समोर आलं होते.