मुंबई: जगभरात ९४ व्या ऑस्कर पुरस्काराची तयारी जोरात सुरु आहे. आता यात विद्या बालनचा ‘शेरनी’ चित्रपटाचे नाव ऑस्कर पुरस्काराच्या यादीत समावेश झाले आहे त्याच सोबत विक्की कौशलचा ‘सरदार उधम’ या चित्रपटाचे नाव देखील या यादीत समाविष्ट झाले आहे. त्यामुळे आता शेरनी आणि सरदार उधम या दोन चित्रपटांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे.
ऑस्कर पुरस्कार २०२२ च्या नामांकनासाठी एकूण चौदा भारतीय चित्रपटांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहे. यात चौदा चित्रपटांच्या यादीत बॉलिवूडमधील’शेरनी’ आणि ‘सरदार उधम’ या दोन चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे यातील कोणत्या चित्रपटाची ऑस्करसाठी वर्णी लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सोबतच प्रादेशिक चित्रपटांमध्ये योगी बाबू यांचा ‘मंडेला’, मल्याळम भाषेतील ‘नयट्टू’ चित्रपटाचे नाव शॉर्टलिस्ट केले गेले आहे. दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांना ऑस्कर पुरस्कारच्या नामांकनांसाठी नामांकित केले जाते. मात्र त्यापैकी फक्त एका चित्रपटाला ऑस्करसाठी अधिकृतरित्या प्रवेश दिला जातो. त्यामुळे यंदा ऑस्करचे तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.