TOD Marathi

मुंबई: लालबाग परिसरामधील वन अविघ्न पार्क या आलिशान इमारतीला आज दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग लेव्हल चारची असल्याचं सांगण्यात येत आहे. लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारी ही इमारत ६० मजल्यांची असून १९ व्या मजल्यावर आग लागली आहे. एक व्यक्ती गॅलरीला लटकून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच खाली पडल्याचंही समोर आलं आहे.

घटनेची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबाल चहल घटनास्थळी पोहोचले आहेत. यावेळी या इमारतीतल्या रहिवाशांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली आहे. या घटनेबद्दल बोलताना पेडणेकर म्हणाल्या, ही आग कशामुळे लागली याबद्दल नक्की काही कळलं नाही. तो व्यक्ती ज्यावेळी इमारतीला लटकत होता, तेव्हा थोडी समयसूचकता दाखवली असती, तो पडू नये याची काळजी घेतली असती तर त्याचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

आयुक्त चहल घटनास्थळी पोहोचताच इथल्या रहिवाशांनी त्यांना घेराव घातला. चहल यांच्याकडे संताप व्यक्त करत त्यांनी आपली व्यथाही चहल यांनी बोलून दाखवली. रेफ्युजी एरियामध्ये पाण्याची सुविधा ठेवली नाही इतका निष्काळजीपणा केला आहे. इतकी आग लागल्यानंतरही पाण्याची सुविधा नाही. फायर सिस्टिम फेल गेली आहे. २०२० ला सोसायटी तयार झाली. बिल्डर घरे ताब्यात देत नाहीये, असे आरोप रहिवाशांनी केले आहेत.