TOD Marathi

मुंबई | चित्रबोली क्रिएशन्स निर्मित, वन कॅम प्रोडक्शन्स सहनिर्मित ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’ ही वेबफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. अक्षय विलास बर्दापूरकर सादर करत असलेल्या या वेबफिल्मचे दिग्दर्शन मयूर शाम करंबळीकर आणि टीमने केले आहे.

पोस्टरमध्ये एक फाशीचा दोर दिसत आहे. हेच रहस्य ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’मध्ये उलगडणार आहे. सध्या तरी या चित्रपटातील कलाकार पडद्याआड असले तरी लवकरच ते समोर येतील. आदित्य विकासराव देशमुख, वेदांत विवेक मुगळीकर यांनी या वेबफिल्मच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

हेही वाचा ” …कुटुंब रंगलय चित्रपटात; मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे एकत्र”

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मयूर शाम करंबळीकर म्हणतात, ‘’या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना जुन्या काळात घेऊन जाणारी आहे. विनायक पंडित या एका कलाकाराची जीवन गाथा आणि त्याच्या जवळच्या लोकांचा त्याला असलेला लळा यात पाहायला मिळणार आहे. हा प्रवास प्रेक्षकांना एका जागी खिळवून ठेवणारा आहे.’’

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’भावनिक आणि कौटुंबिक अशी ही वेबफिल्म आहे. कथेची मांडणी अतिशय सुरेख केली असून विचार करायला लावणारा हा विषय आहे. प्लॅनेट मराठीने नेहमीच वैविध्यपूर्ण विषय हाताळले आहेत. प्रेक्षकांना काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याच्या प्रयत्नात आम्ही नेहमीच असतो. त्यामुळेच असे वेगवेगळे विषय आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत.’’