मुंबई: सरकारी तेल कंपन्यांनी आज दिनांक २० ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे ३५ पैशांनी वाढ केली आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पेट्रोल पंपांसमोर मोदींचे बॅनर्स झळकावत आंदोलन करण्यात आलं.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदींच्या बॅनरर्सवर ‘बघतोय काय रागानं, पेट्रोलनंतर डिझेलचं सुद्धा शतक करुन दाखवलंय वाघानं, असं लिहिण्यात आलं आहे. आंदोलकांनी पेट्रोल पंपासमोर केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही केली.
मुंबईत पेट्रोल 112.11 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेलही 102.89 रुपयांनी विकलं जात आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 106.19 रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे. तर या दरवाढीनंतर डिझेलचे दर 94.92 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.