नवी दिल्ली: आधीच महागाई वाढत आहे, पेट्रोल डिझेल सोबतच खाद्य तेलांच्या किमतीही वाढवल्या आहेत. त्यातच आता टीव्ही पाहणं देखील महागणार असल्याची बातमी समोर आली आहे. आता 1 डिसेंबरपासून टीव्ही चॅनल्सची बिले वाढणार आहेत. यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांचे वाढत्या महागाईमुळे चांगलंच आर्थिक फटका बसणार असल्याचे दिसत आहे.
देशातील प्रमुख ब्रॉडकास्टिंग नेटवर्क्स झी, स्टार, सोनी आणि Viacom18 ने काही चॅनल्स आपल्या प्लॅनमधून बाहेर काढले आहेत. त्यामुळे टीव्ही पाहणाऱ्या ग्राहकांना 50 टक्क्यांपर्यंत अधिक खर्च करावा लागू शकतो. मार्च 2017 मध्ये TRAI ने टीव्ही चॅनेल्सच्या किमतींबाबत नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) जारी केली होती. त्यानंतर 1 जानेवारी 2020 रोजी NTO 2.0 जारी झाला. यामुळे सर्व नेटवर्क NTO 2.0 नुसार त्यांच्या चॅनेलच्या किमती बदलत आहेत.
ब्रॉडकास्टिंग नेटवर्कच्या प्लॅनमध्ये ऑफर केलेल्या चॅनेलचे मासिक मूल्य 15-25 रुपये ठेवले गेले. परंतु ट्रायच्या नवीन दर आदेशात हे किमान 12 रुपये निश्चित करण्यात आले. अशा स्थितीत चॅनेल्सना त्यांचे बहुतेक चॅनेल फक्त 12 रुपयांमध्ये देऊ करणे खूप खर्चिक ठरू शकते. हे नुकसान कमी करण्यासाठी नेटवर्कने काही लोकप्रिय वाहिन्या बुकमधून काढून त्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
स्टार प्लस, कलर्स, झी टीव्ही, सोनी आणि काही प्रादेशिक चॅनेल यांसारख्या लोकप्रिय चॅनेल पाहण्यासाठी दर्शकांना 35 ते 50 टक्के अधिक पैसे द्यावे लागतील. स्टार आणि डिस्ने इंडिया चॅनेलसाठी दरमहा 49 रुपयांऐवजी त्याच संख्येच्या चॅनेलसाठी 69 रुपये मोजावे लागतील. सोनीसाठी त्याला दर महिन्याला 39 ऐवजी 71 रुपये खर्च करावे लागतील. ZEE साठी 39 रुपयांऐवजी दरमहा 49 रुपये आणि वायकॉम 18 चॅनेलसाठी दरमहा 25 रुपयांऐवजी 39 रुपये दरमहा खर्च होणार आहे.