नवी दिल्ली: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर सध्या पंजाब राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच बदलत असल्याचे चित्र दिसत आहे. आता कॅप्टन अमरिंदर सिंग हे दिल्ली येथे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसचा चेहरा जर नवज्योतसिंह सिद्धू असतील तर त्यांचा पराभव करण्यासाठी आपण कोणताही त्याग करायला तयार असल्याचं कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या आधीच स्पष्ट केलंय. त्यामुळे आता ते भाजप सोबत जाऊन कुठली नवीन राजकीय खेळी खेळणार की काय, अशी चर्चा रंगत आहे.
मात्र गेल्या आठ महिन्यापासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका पंजाबमध्ये भाजपला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण ऐनवेळी कॅप्टन अमरिंदर सिंह भाजपच्या हाती लागल्यास सत्तेचा डाव भाजपच्या बाजूने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.