टिओडी मराठी, लातूर, दि. 9 ऑगस्ट 2021 – सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. अशातच तिसऱ्या लाटेचा धोकाही वर्तविला जात आहे. त्यामुळे अशा कोरोना काळात गरजू रुग्णांना अतिशय जलदपणे आरोग्यसेवा मिळावी, म्हणून खासदार सूधाकरराव श्रृंगारे यांच्या स्थानिक विकासनिधीतून जिल्ह्यास पाच रुग्णवाहिका मंजूर झाल्यात. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा सक्षम होणार असून लवकरच या रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले जाणार आहे.
खासदार स्थानिक विकासनिधीतून महिला शासकीय रुग्णालय लातूर ,चाकूर ग्रामीण रुग्णालय, देवणी आणि औराद शहाजनी इथल्या रुग्णवाहिकेस प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. उर्वरीत अहमदपूर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका प्रस्तावास लवकर मंजूरी मिळणार आहे.
कोरोना काळामध्ये रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी आणि कोरोना संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातील रुग्णसेवेला अधिक बळकटी मिळणार आहे. रुग्णांना अधिकाधिक आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी दिली आहे.
या नवीन रुग्णवाहिकेमुळे लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम होणार आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध असलेल्या या रुग्णवाहिका लातूर जिल्ह्यातील आरोग्य विभागास लवकरच उपलब्ध होणार आहेत.
त्यामुळे लातूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आणि या संकटावर मात करण्यासाठी या रुग्णवाहिका अत्यंत महत्वपूर्ण ठरतील, असा विश्वास खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी व्यक्त केला.
ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम होणार –
रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णसेवेचे व्रत अंखडीतपणे सुरु राहणार आहे. या रुग्णवाहिका अनेक रुग्णांच्या सेवेत कामी येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या रुग्णवाहिकेमुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक मजबूत आणि बळकट होणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णसेवा घडत राहील, असा विश्वास खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी व्यक्त केला आहे.