टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 3 ऑगस्ट 2021 – इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावलीय. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने या याचिकेला प्रसिद्धीसाठी दाखल केलेली याचिका असे म्हटले आहे. आणि याचिकाकर्त्याला दहा हजार रुपयांचा दंडही सुनावला आहे.
या याचिकेद्वारे याचिकाकर्त्याने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले होते, परंतु त्यांच्याकडे ईव्हीएमबद्दल काही खास माहितीही नव्हती, त्यामुळे उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली.
आगामी निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरने घ्याव्यात, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, जगातील अनेक देशांत ईव्हीएमऐवजी पुन्हा एकदा बॅलेट पेपरद्वारे निवडणुका सुरू झाल्यात.
ज्या देशांनी ईव्हीएम सुरूवात केली, ते देखील पुन्हा बॅलेट पेपर निवडणुका घेत आहेत. आपल्या देशातील अनेक पक्षांच्या नेत्यांचा देखील ईव्हीएमवर विश्वास नाही. केवळ केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे, असे याचिकाकर्त्याने या याचिकेत म्हटले आहे.
सुनावणी वेळी उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारले की, असे काय आहे?, ज्या आधारे तुम्ही हे सांगत आहात की, ईव्हीएममध्ये अडथळा येऊ शकतो?. यावर याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, जर्मनीच्या सर्वोच्च न्यायालयानेही ईव्हीएमचा वापर असंवैधानिक घोषित केलाय. मात्र, एवढा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही.