टिओडी मराठी, दि. 25 जुलै 2021 – कोकणामध्ये वारंवार उद्भवणाऱ्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरुपी उपायोजना करण्यात येणार आहे. यासाठी 3700 कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या समितीच्या बैठकीत मंजूर केले आहे, असे राज्याचे मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. खेड शहरातील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांच्यासोबत माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम तसेच आमदार योगेश कदम उपस्थित होते.
कोकणावर वारंवार येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी कोकणात भूमिगत वीज केबल टाकणे आवश्यक आहे. पूर, वादळ अशी नैसर्गिक आपत्ती उद्भवते तेव्हा वीजयंत्रणा ठप्प होते. त्यामुळे मदतकार्यातही अडचणी येतात.
कोकणावर येणारे संकट दूर करण्यासाठी सरकारडून उपाययोजना करण्यात येत आहेत. कोकणावर एकापाठोपाठ एक नैसर्गिक संकटं येत आहेत. निसर्ग आणि तौक्ते वादळानंतर कोकणाला आता बसलेल्या अतिवृष्टीच्या फटका बसला आहे.
यात अतोनात नुकसान झाले आहे. यात अनेकांचे जीवही गेले आहेत. भविष्यात हे टाळता यावे यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
22 जुलैला झालेल्या अतिवृष्टीत खेड शहराला पुराचा वेढा पडला आहे. खेडची बाजारपेठ अनेक तास पाण्याखाली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. उद्ध्वस्त झालेल्या खेड शहराची पाहणी करण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्विकास मंत्री खेड दौऱ्यावर आहेत.
रविवारी सकाळी शहराची पाहणी केल्यावर प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, कोकणाला सध्या विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो आहे. मागील चार वर्षात दोन वादळं आणि आता अतिवृष्टी यामुळे कोकणाची पुरती वाट लागलीय.