टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 21 जुलै 2021 – देशातील बहुतांश सर्व राज्यांतील सरकारच्या शिक्षण विभागाचे दहावीचे निकाल जाहीर झालेत. अनेक ठिकाणी प्रवेश प्रक्रियाही सुरु झालीय. मात्र, केंद्रिय माध्यमिक परीक्षा विभागाचा (सीबीएसई) इयत्ता दहावीचा निकाल 20 जुलै रोजी जाहीर होणार, असे काही दिवसांपूर्वी सांगितले जात होते. मात्र, 20 जुलै तारीख होऊन गेली आहे. तरीही सीबीएसईच्या इयत्ता दहावीच्या निकालाबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती, सूचनाही मिळेना अशी स्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत असल्याचे आढळत आहेत. तर बारावीचा निकाल 31 जुलै रोजी जाहीर केला जाणार आहे, असं केवळ सांगण्यात येत आहे.
दि. 20 जुलै रोजी सीबीएसईचा निकाल जाहीरच न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांनी संताप व्यक्त केला आहे. पहिली बाब म्हणजे निकालाची तारीख आणि निकालाचे निकष ठरविण्यात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सातत्याने चालढकल करत आहे, असे यावरून समजून येत आहे.
सीबीएसई बोर्डाच्या दहावीचा निकाल 20 जुलै रोजी जाहीर केला जाईल, असेही या बोर्डाने सांगितले होते. मात्र, लक्षावधी पालकांनी बोर्डाच्या वेबसाईटवर भेट दिल्यावर तिथे निकाल नाही आणि त्याबाबत काही सूचना देखील नाही, असे आढळले.
कोणत्याही क्षणी निकालाची अपडेट येईल अन आपल्याला विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा निवडता येईल, अशा आशेने अनेक शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचे लक्ष या वेबसाईटकडे लागले होते.
मात्र, रात्री 11 पर्यंत या वेबसाईटवर (www.cbseresults.nic.in) कोणतीही निकालाची अपडेट आलेली नाही. एवढंच नव्हे तर दहावीचा निकाल नक्की केव्हा लागणार आहे?, तो पुढे ढकलला आहे का?, असल्यास कोणत्या कारणामुळे याविषयीची माहिती दिली जाणार आहे? असे अनेक प्रश्न पडत आहेत.
मात्र, याबाबत काहीही माहिती अथवा परिपत्रक प्रसिद्ध न काढल्याने संभ्रमाचे आणि संतापाचे वातावरण पालकांसह विद्यार्थ्यात निर्माण झाले आहे.
नाव न छापण्याच्या अटीवर अनेक पालकांनी असे सांगितले की, सीबीएससी बोर्डाकडून वेळेत अधिकृत माहिती देण्याबाबर नेहमी टाळाटाळ केली जाते. तसेच विद्यार्थी, पालकांसह शैक्षणिक संस्थांनाही अनेकदा गृहित धरले जाते.
एका संस्थाचालकाने असे सांगितले की, बोर्डाच्या संकेतस्थळावर काहीही माहिती न मिळाल्यास पालक व विद्यार्थी संस्थेत फोन करुन माहिती विचारत असतात. मात्र, त्याबाबत आम्हालाही कसलीही सूचना नाही, त्यामुळे आम्हाला निष्कारण पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.