टिओडी मराठी, दि. 14 जुलै 2021 – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यामध्ये नवी लोकसंख्या नीती आणण्याची घोषणा केली. योगींच्या लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबतची जोरदार चर्चा सुरू झालीय. पण, योगींचे हे पाऊल त्यांच्यावर उलटणार आहे, अशी शक्यता वर्तविली जात आहे. कारण, नव्या लोकसंख्या नियंत्रण कायद्यानुसार तीन किंवा त्यापेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना निवडणुकीला उभं राहता येणार नाही. यामुळे उत्तर प्रदेशच्या विधानसभेतील भाजपच्या एकूण आमदारांपैकी ५० टक्के आमदार अपात्र ठरतील, अशी माहिती समोर आलीय.
उत्तर प्रदेश विधानसभेकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या अधिकृत वेबसाइट्सवर एकूण ३९७ विधानसभा सदस्यांची वैयक्तिक माहिती अपडेट केली आहे. यातील ३०४ सदस्य सत्ताधारी भाजपचे आहेत. त्यात १५२ आमदार म्हणजेच निम्म्या आमदारांना तीन किंवा त्याहून जास्त अपत्य आहेत.
एवढंच नव्हे, तर भाजपच्या एका आमदाराला ८ अपत्य आहेत. तर, आणखी एका आमदाराला ७ अपत्य आहेत. याशिवाय ८ आमदारांना प्रत्येकी ६ अपत्य आहेत. तर १५ सदस्यांना प्रत्येकी ५ अपत्य आहेत.
सत्ताधारी भाजपच्या एकूण आमदारांपैकी ४४ आमदार यांना प्रत्येकी ४ अपत्य आहेत. तर ८३ आमदारांना प्रत्येकी ३ अपत्य आहेत. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू झाल्यास हे सर्व विधानसभा सदस्य नियमानुसार अपात्र ठरतील.
या दरम्यान, लोकसभेत ही लोकसंख्या नियंत्रण कायद्याचे विधेयक मांडली जाणार आहे, अशी शक्यता आहे. यामध्ये गोरखपूरचे खासदार रवी किशनदे ही लोकसंख्या नियंत्रणाबद्दल खासगी विधेयक मांडणार आहे, असे सांगितलं जात आहे. पण, खुद्द रवी किशन यांना ४ अपत्य आहेत. त्यामुळे त्यांचे नाव पुढे येताच सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा रंगली.
लोकसंख्या नियंत्रणाचा आग्रह धरणाऱ्या रवी किशन यांनाच ४ मुले आहेत. याकडे अनेकांनी लक्ष वेधलं आहे. काहींनी रवी किशन यांचा कुटुंबासोबतचा फोटो ट्विट केला, तर काहींनी या परिस्थितीला दिव्याखाली अंधार म्हणत खिल्ली उडवलीय.