टिओडी मराठी, नागपूर, दि. 8 जुलै 2021 – यंदा तरी आषाढी एकादशीला मानाच्या दहा पालख्यांसह इतर पालख्यांनाही पंढरपूर येथे जाण्याची परवानगी मिळावी, यासाठी दाखल केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला पंढरपूर येथे मानाच्या दहा पालख्याच जातील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि अनिल किलोर यांनी हा निर्णय दिला आहे. लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने याबाबत याचिका दाखल केली होती.
यंदा येत्या २० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. या दिवशी दरवर्षी हजारो पालख्या पंढरपूरला जातात. परंतु कोरोना संक्रमणामुळे मागील वर्षीपासून पंढरपूर वारीवर निर्बंध लावलेत. यंदा राज्य सरकारने केवळ दहा मानाच्या पालख्यांना पंढरपूर येथे जाण्याची परवानगी दिलीय. न्यायालयाने सरकारच्या या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
कोरोना संक्रमण लक्षात घेता सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य असून त्यात काहीच अवैधतता नाही. तसेच, हा निर्णय घेताना विदर्भासोबत भेदभाव केल्याच्या आरोपात देखील काहीच तथ्य नाही.
वर्तमान परिस्थितीत अशा धार्मिक सोहळ्याविषयी धोरण ठरवण्यासाठी सरकार हेच योग्य प्राधिकरण आहे. न्यायालय याविषयी आदेश देऊ शकत नाही, असे न्यायालयाच्या निर्णयात स्पष्ट केलं आहे.