TOD Marathi

नागपूर : रस्त्यावरील मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना (Street Dogs) अनेकदा प्राणीप्रेमी (Dog Lovers) बिस्किटं किंवा इतर खाद्य खाऊ घालताना दिसून येतात. मात्र आता सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना अशाप्रकारे खाऊ घातलं, तर त्या व्यक्तीवर कारवाई होण्याची शक्यता आहे. नुकतंच हायकोर्टाने (High Court orders) याबाबत महत्त्वाचा आदेश दिला आहे. यापुढे जर मोकाट कुत्र्यांना खाऊ घालायचे असेल तर त्यासाठी आधी महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागेल. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ न घालता मनपाच्या परवानगीनंतर घरी नेऊन त्यांना खाऊ घालायचे आदेश हायकोर्टाकडून देण्यात आले आहे.

नागपुरातील मोकाट कुत्र्यांच्या विरोधात उच्च न्यायालयाने सक्तीचे पाऊल उचलेले आहेत. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असल्यानं हायकोर्टाने हे निर्णय घेतल्याचं दिसत आहे.

सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खायला घालू नये, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्याचप्रमाणे ज्या प्राणीप्रेमींना कुत्र्यांना खाऊ घालायचे आहे, त्यांनी मनपाची आधी परवानगी घ्यावी, आणि कुत्र्यांना घरी नेऊन खाऊ घालावे, असंही हायकोर्ट म्हणालंय.

हायकोर्टाच्या या निर्णयामुळे मोकाट कुत्र्यांवर प्रेम करणाऱ्या प्राणीप्रेमींवर निर्बंध येणार आहेत. फक्त इतकंच नाही, तर मोकाट कुत्र्यांवर कारवाई करताना प्राणीप्रेमींनी जर हस्तक्षेप केला, तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत.

नागपुरात महापालिका, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना मोकाट कुत्र्यांबाबत कायदेविषयक जनजागृती करावी, असे निर्देश हायकोर्टाने जारी केलेत. पोलिसांनी वेळोवेळी नोटीस काढावी आणि मोकाट कुत्रे रस्त्यावर दिसायला नको, असे नियम लावले जावेत, असंही हायकोर्ट म्हणालंय. शिवाय सरकारने मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी मंजूर केलेले 17 कोटी रुपये 8 आठवड्यांमध्ये मनपाला देण्याचे आदेशही दिले गेलेत.