टिओडी मराठी, जीनिव्हा, दि. 8 जुलै 2021 – मागील दोन वर्षांपासून जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग सध्या नियंत्रणात येत आहे. त्यामुळे जगात करोनाग्रस्तांच्या मृत्यू दरात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर, भारतासह अनेक देशात देखील करोनाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे काही देशांनी पर्यटनाला वाव दिला आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी साप्ताहिक अहवाल जाहीर केला आहे.
जगात आठवड्यात ५४ हजार करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आकडा अगोदरच्या आठवड्यापेक्षा सात टक्क्यांनी कमी आहे. ऑक्टोबरपासूनचा नीचांक आकडा ठरला आहे. जगात करोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा ४० लाखांवर गेला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी साप्ताहिक अहवाल जाहीर केला. यानुसार, २८ जून ते ४ जुलै या आठवड्यात जगात करोनाच्या २६ लाख रुग्णांची नोंद झाली आहे. हे प्रमाण अगोदरच्या आठवड्यापेक्षा किंचित अधिक आहे. मात्र, ५३ देशांच्या युरोपीय विभागात करोना रुग्णसंख्येत ३० टक्के एवढी मोठी वाढ नोंदवली आहे.
नवीन रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण ब्राझील, भारत, कोलंबिया, इंडोनेशिया आणि ब्रिटन या देशात आहेत. मात्र, यापैकी ब्राझील आणि भारतात या आठवड्यात नवीन करोना रुग्णांची संख्या घटली आहे. तर उर्वरित तीन देशांत ती वाढली आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.
करोनाच्या डेल्टा वेरिएंटच्या संसर्गामुळे करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यात आता लॅम्बडा वेरिएंटचाही फैलाव होत आहे. लॅम्बडा वेरिएंट ३० देशांत आढळला आहे. तर, डेल्टा वेरिएंट ९६ देशांत आढळला आहे. लॅम्बडा वेरिएंट कितपत घातक आहे, हे जाणून घेण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.