टिओडी मराठी, बारामती, दि. 27 जून 2021 – ‘सरकार चालवत असताना अडचणी येतात. त्यामुळे कुठल्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी तिन्ही पक्षाचे सहकारी एकत्र बसतात व त्यावर निर्णय घेतात. त्यामुळे हे सरकार व्यवस्थित चाललं आहे. त्यातून हे सरकार पाच वर्षे टिकेल याबद्दल शंका नाही’ असे मत राष्ट्रवादी सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.
मागील काही दिवसांपासून पदोन्नती आरक्षण व ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुरी वाढल्या होत्या. त्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे भाजप शिवसेना युतीची चर्चा रंगली होती. या मुद्यावर प्रसारमाध्यमाशी बोलताना शरद पवार यांनी भूमिका मांडली.
महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना आम्ही काही मुद्यांवर एकत्र आलो. त्यावेळी कॉमन मिनीमम कार्यक्रम तयार केला होता. सरकार चालवत असताना काही ना काही अडचणी येतात. या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी एक यंत्रणा स्थापन केली आहे.
यात काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, तर राष्ट्रवादीकडून अजित पवार व जयंत पाटील हे समन्वय साधण्याचे काम करतात.
सरकारमध्ये काही अडचण आल्यास धोरणात्मक निर्णय हे सहाजण घेतात. त्यामुळे हे सरकार पाच वर्ष चालेल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असे शरद पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितले.
आपल्या पक्षाची संघटनात्मक शक्ती वाढविण्यासाठी यात काही गैर नाही. शिवसेना असो, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असो सर्व पक्षांना संघटना वाढविण्याचा पूर्ण अधिकार आहे. याबद्दल आमच्यात सामंजस्य असून कुठेही मतभेद नाही, असे पवार म्हणाले.
आरबीआयने नवीन आदेश दिले असून आमदार, खासदार आणि मंत्र्यांना आता सहकारी बँकेचे अध्यक्षपद मिळणार नाही. यावर शरद पवार म्हणाले, की, आरबीआय ही अर्थकारणावर आणि संबंधित संस्थांवर नियंत्रण असणारी संस्था आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेतला असेल तर त्याची माहिती घ्यावी लागेल. परंतु, त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर तो स्वीकारावा लागेल.