टिओडी मराठी, मुंबई, दि. 26 जून 2021 – महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक झाले असून राज्यात आंदोलन सुरु केलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी भाजप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेल्याचा आरोप त्यांनी केलाय. दुसरीकडे नागपूरमध्येही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं आहे. कोल्हापुरामध्ये चंद्रकांत पाटील यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ओबीसी पदोन्नती आरक्षणासंदर्भात आज भाजपचे नेतेमंडळी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन करत आहेत. शहरातील किंवा जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांवर बसून हे आंदोलन केले.
भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते प्रवणी दरेकर यांना ठाण्यात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर, मुलुंड इथं आमदार आशिष शेलार व मनोज कोटक यांनाही ताब्यात घेतलं आहे. मुंबईत भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरुय.
या दरम्यान, भाजपच्या या आंदोलनात अधिक प्रमाणावर कार्यकर्त्यांनी गर्दी केलीय. महाराष्ट्रात कोरोनाचं संकट कमी झालेलं नाही. त्यात डेल्टा प्लसने नवं आव्हान निर्माण केलं असताना असे आंदोलन सुपरस्प्रेडर तर ठरणार नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आंदोलनात अनेकजण मास्क याशिवाय दिसत आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंग कुठेही नाही, असे दिसत आहे.