टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 22 जून 2021 – गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचे राजकारण तापलं आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासह अनेक मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यात दोन जिल्ह्यांत मराठा मोर्चे काढले आहेत. छत्रपती संभाजीराजे यांनी विषय लावून धरल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका आज अखेर दाखल केलीय.
खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून आक्रमक झालेत. त्यांनी राज्य सराकरला एक महिन्याचा अल्टीमेटम दिलाय. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असेही म्हटलं होतं. त्यांनी आपल्या मागण्यांमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला आज यश आलंय.
संभाजीराजे यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिलीय. मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केली होती. ती मान्य केली असून आज सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल केली.
माझ्या मागणीनुसार या याचिकेत गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरीत अॅनेक्शर्स भाषांतरीत करण्यात येतील, असे नमूद केलं आहे, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिलीय.
कोल्हापूरमध्ये झालेल्या मोर्चात संभाजीराजे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे 7 मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या मागणीचा समावेश होता.