टिओडी मराठी, दि. 17 जून 2021 – ऑटोमेशन प्रक्रियेमुळे भारतातील आयटी कंपन्यामध्ये काम करणाऱ्या 30 लाख लोकांच्या नोकरीवर 2022 साली गदा येणार आहे. ही शक्यता बँक ऑफ अमेरिकेने जाहीर केलेल्या एका अहवालात वर्तविली आहे.
भारतातील विप्रो, कॉग्निजंट, इन्फोसिस या सारख्या मोठ्या आयटी कंपन्या आहेत. त्यात सुमारे 30 लाख नोकऱ्या जाऊ शकतात, असे या अहवालात सांगितले आहे. भारतासह अमेरिकेलाही ऑटोमेशनचा फटका बसणार आहे. त्या देशातीलही 10 लाख नोकऱ्या जाणार आहेत.
भारतातील आयटी कंपन्यांत आता सुमारे 90 लाखांहून अधिक लो स्किल कर्मचारी काम करतात. या लो स्किल कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर यांत्रिकीकरणाचा वापर अर्थात ऑटोमेशनमुळे गदा येणार आहे, असे अहवालात सांगितले आहे.
भारतात आयटी क्षेत्रात अधिक प्रमाणात कर्मचारी काम करतात. तसेच परदेशातील आयटी क्षेत्रात अनेक भारतीय लोक काम करतात. त्यांना ऑटोमोशनच्या प्रक्रियेचा फटका बसणार आहे. या क्षेत्रात ऑटोमेशन केल्यामुळे सुमारे 100 अब्ज रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारचा निर्णय या कंपन्यांकडून घेतला जाणार आहे, असा अंदाज आहे.
बँक ऑफ अमेरिकेच्या या अहवालात असे देखील सांगितले आहे की, भारत आणि चीन या दोन देशांना या ऑटोमेशनचा फटका अधिक प्रमाणात बसणार आहे. या दोन देशांच्या तुलनेत गल्फ देशांसह जपान या देशांना कमी प्रमाणात बसणार आहे.