टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 15 जून 2021 – आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी राम मंदिर ट्रस्टने खरेदी केलेल्या जमीन व्यवहारामध्ये घोटाळा झाला आहे, असा आरोप केलाय. यानंतर त्यांनी, माझी हत्या झाली तरी चालेल पण, प्रभू श्रीरामाच्या नावे बनणाऱ्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही, असे संजय सिंह यांनी म्हटलंय.
ट्रस्टने 2 कोटी रुपयांची जमीन 18.5 कोटी रुपयांत खरेदी केली होती. दोन्ही देवघेव 5 मिनिटांत केली गेली, असाही संजय सिंह यांचा दावा आहे. यानंतर संजय सिंह यांच्या घरावर हल्ला केला गेला आहे. संजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिलीय.
ट्विटमध्येसंजय सिंह म्हणाले, माझ्या घरावर हल्ला झालाय. भाजपवाल्यांनी कान उघडे ठेवून ऐकावं, कितीही गुंडगिरी केली तरी प्रभू श्रीरामाच्या नावे बनणाऱ्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही. त्यासाठी माझी हत्या झाली तरी चालेल.
संजय सिंह यांचा दावा आहे की, राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या इशाऱ्यावर देवाण-घेवाण केली गेली होती. ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा व अयोध्याचे महापौर ऋषिकेश उपाध्याय रजिस्ट्रीचे साक्षीदार होते, असे सांगून सिंह यांनी या व्यवहाराची सीबीआय आणि ईडीकडून चौकशीची मागणी केली.
संजय सिंह म्हणाले की, ‘मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या नावावर इतका मोठा घोटाळा ऐकून तर पायाखालची जमीन निसटून जाईल. हा देशातील कोट्यवधी लोकांच्या आस्थेवर आघात आहे.
राम मंदिरासाठी जमीन खरेदीसंदर्भात समाजवादी पक्षाचे माजी आमदार पवन पांडेय यांनी केलेल्या आरोपावर मी काही भाष्य करण्याअगोदर आरोपांचा अभ्यास करीन, असे श्री राम मंदिर ट्रस्टचे महासचिव आणि विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ नेते चंपत राय यांनी म्हटले. पूर्वी अनेक आरोप झालेत. एवढेच काय महात्मा गांधी यांच्या हत्येचाही आरोप झालाय.