टिओडी मराठी, पुणे, दि. 22 मे 2021 – कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण मोहीम गरजेची आहे. मात्र, सध्या देशात लसीचा तुटवडा भासत आहे, त्यास केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप सीरम इन्स्टिट्यूटने केला आहे.
देशात 1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार आहे, असं घोषित केलं होतं. मात्र, सध्या लसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतोय. कुठे अठरा वर्षावरील नागरिकांना लस मिळत नाही. अन 45 वर्षावरील व्यक्तींनाही लसची वाट पाहावी लागत आहे.
देशात सध्या सुरू असलेल्या लस टंचाईच्या पार्श्वभूमीवर, पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी शुक्रवारी असं म्हटलं, केंद्र सरकारने लसच्या साठ्याबाबत काहीही माहिती न घेता आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या गाइडलाइन्सवर विचार न करता 18 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली.
पुढे सुरेश जाधव म्हणाले, भारतात किती लस शिल्लक आहेत? याबाबत आरोग्य संघटनेच्या काय गाइडलाइन्स आहेत?, हे जाणून न घेता सरकारने अठरा वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली. देशानं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या गोष्टींचं आणि नियमांचं पालन करायला हवंय. त्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा.
आपण यातून मोठा धडा घेतलाय. आपण एखाद्या वस्तूची उपलब्धता पाहून त्याच्या वापराबाबत योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे. लसीकरण गरजेचं आहे. मात्र, लसीकरणानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे, लोकांनी सावध राहायला हवंय. कोरोनापासून बचावासाठी सर्व नियमांचं पालन करायला हवं, असेही सुरेश जाधव म्हणाले.
असं झालंय लसीकरण :
देशात आतापर्यंत 19.32 कोटीहून अधिक कोरोना लसचे डोस दिलेत. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी याबाबतची माहिती दिलीय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, शुक्रवारी लसीकरण मोहिमेच्या 126 व्या दिवशी लसचे 13,83,358 डोस दिलेत.
शुक्रवारी 18-44 वयोगटातील 6,63,353 जणांना कोरोना लसचा पहिला डोस दिलाय. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात आतापर्यंत सर्व राज्यांत मिळून या वयोगटातील 92,73,550 लाभार्थ्यांना लस दिली आहे.