टीओडी मराठी, बारामती, दि. 15 मे 2021 – कोरोनामुळे देशात हाहाकार माजला आहे. यात अनेकांचा जीव जात आहे. सरकार म्हणाव्या तेवढ्या वेगानं लसीकरण करेना. ऑक्सीजन चा पुरवठा करेना. एखाद्याला कोरोना झाला म्हणजे त्याचा मृत्यू होणार, अशी समज झालीय. मात्र, अशात बारामतीत मुधले गावात एक आश्चर्यकारक घटना घडलीय. मरणाच्या दारात गेलेल्या 76 वर्षीय आजीने डोळे उघडले आणि आजी जिवंत आहे समजल्यावर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
शकुंतला गायकवाड असे या आजींचं नाव असून त्यांना बारामतीतील सिल्व्हर जुबली रुग्णालयात दाखल केलं आहे. मुधले गावात अशी घटना घडल्याचं पोलिसांनीही कबुली दिलीय.
76 वर्षीय आजींना काही दिवसांपूर्वी त्यांना करोना विषाणूचीची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना घरात विलगीकरणात ठेवलं होतं. त्यांची प्रकृती खालावल्याने १० मे रोजी त्यांना बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचं ठरवलं.
आजीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईक वाहनातून नेत होते, तेव्हा 76 वर्षीय आजीची प्रकृती खालावली, त्यांनी प्रतिसाद देणं बंद केलं. त्यामुळे कुटुंबियांनी आजीला देवाज्ञा झाल्याचं गृहीत धरलं. त्यानंतर त्यांनी आजीच निधन झाल्याचं नातेवाईकांना कळवलं आणि अंतिम संस्काराची तयारी सुरु केली.
आजी गेल्याने घरातल्या महिलांनी हंबरडा फोडला, तेवढ्यात आजीने डोळे उघडले. त्यानंतर, आश्चर्यचकीत झालेल्या नातेवाईकांनी तात्काळ आजीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. आणि पुन्हा आजी जिवंत असल्याचं नातेवाईकांना कळवलं.