टिओडी मराठी, दि. 14 मे 2021 – अक्षय्य तृतीयेला हिंदू धर्मात मोठे महत्त्व असून या दिवशी आपल्या पूर्वजांना म्हणजे पितरांना भोजन देण्याचीही प्रथा काही भागामध्ये आहे. त्या दिवशी आमरस करण्याची देखील प्रथा आहे. सोने खरेदीसाठी हा महत्त्वाचा दिवस मनाला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे, असे मानतात.
कालविवेक या ग्रंथात या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केलंय. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत केले जाते, त्यास आखा तीज असेही म्हणतात. तर, ग्रामीण भागात त्याला आखितीही म्हणतात.
ह्या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला. अन त्यांचे लेखनिक म्हणून गणेशने काम केले, अशी आख्यायिका आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीवर अक्षय तृतीया येत असते. अक्षय्य तृतीयेचा दिवस धार्मिक कार्यांसाठी शुभ मानला जातो. या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदीला महत्त्व आहे. या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी केल्यामुळे वर्षभर आर्थिक प्रगती होते. सुख समृद्धीत वाढते.