शिरूर | आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे देशभरातील सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. मविआतील काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत. त्याचबरोबर पक्षांतर्गतही बैठका, कोअर कमिटीच्या बैठका सुरू आहे. अनेक ठिकाणी मतदारसंघनिहाय बैठका आणि चर्चा होत आहेत.
पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील शिरूर मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाकडे आहे. अमोल कोल्हे हे शिरूरचे खासदार आहेत. परंतु, शिवसेनेचा ठाकरे गट या मतदारसंघासाठी अग्रही असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचित केली. यावेळी सचिन अहिर यांनी सांगितलं की शिरूरबाबत आमच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत.
हेही वाचा ” …पवारांच्या गडावर काँग्रेसचा डोळा; पृथ्वीराज चव्हाण ‘या’ मतदारसंघासाठी आक्रमक”
शिरूर मतदारसंघासाठी शिवसेनेचा ठाकरे गट अग्रही असल्याचं बोललं जात आहे. त्याबद्दल काय सांगाल असा प्रश्न विचारल्यावर सचिन अहिर म्हणाले, कार्यकर्त्यांची तशी भावना आहे. शिरूरमध्ये आम्ही याआधी लढलो होतो. लोकसभेत विद्यमान खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे आहेत. ते सध्या तिथले विद्यमान खासदार आहेत. परंतु तिथल्या आमच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत.
सचिन अहिर म्हणाले, पुण्यातील कसबा मतदारसंघात आम्ही काँग्रेसला मदत केली होती. मग यावेळी त्यांनी आमच्याबाबत विचार का करू नये? बाजूचा मतदारसंघ मावळमध्ये आमचा निवडून आलेला खासदार आहे. मी सांगितल्याप्रमाणे ही काही मागणी करण्यासाठी बैठक (ठाकरे गटाची बैठक) नाही. ही संघटनात्मक बैठक आहे.