मुंबई | राज्यात सत्तांतर होऊन वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसंच मंत्रिमंडळाची स्थापनाही करण्यात आली. त्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सांगण्यात येत होतं. मात्र सत्ता स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही विस्तार करण्यात झालेला नाही. गेल्या वर्षभरात मंत्रिपदाकडे आस लावून बसलेल्या काही आमदारांनी विलंबावरून जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. या आमदारांना अखेर आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खूशखबर दिली असून जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ‘केंद्र आणि राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा काही संबंध नाही. केंद्राचा कधी होणार हे आम्हाला माहिती देखील नाही. आम्ही राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात जास्त इंटरेस्टेड आहोत. राज्यातील अनेक प्रश्न असतात. त्यासाठी केंद्राची भेट घ्यावी लागते. त्याचा पाठपुरावा करावा लागतो. या संदर्भातच अनेक बैठका असतात. त्यामुळे दिल्लीला जावं लागतं,’ ‘मंत्रिमंडळ विस्तार आम्हाला देखील करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील. मी विश्वासाने सांगतो की जुलै महिन्यामध्ये आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू.’असं फडणवीस म्हणाले.
हेही वाचा “...कल्याण-डोंबिवलीची जागा कोण लढवणार, फडणवीसांनी सस्पेन्स संपवला, म्हणाले…”
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी जुलैमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं स्पष्ट केल्याने आता मंत्रिमंडळात कोणा-कोणाचा समावेश होणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. कारण भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहे. या इच्छुकांना मंत्रिमंडळात सामावून घेताना शिंदे-फडणवीसांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.