पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. तसेच भाजप कार्यकर्त्यांनी यांचे आणखी घोटाळे बाहेर काढावेत, असं आवाहन केलं. यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “मोदींनी शिखर बँकेबाबत आरोप केले. मात्र, शिखर बँक तर सोडाच, मी कुठल्याही सहकारी बँकेचा सदस्य नाही. या सहकारी बँकांकडून मी कधी कर्जही घेतलेलं नाही. शिखर बँकेबाबत मागे एकदा तक्रार झाली होती. चौकशीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि भाजपच्या काही लोकांची नावं आली.”
हेही वाचा” …कल्याण-डोंबिवलीची जागा कोण लढवणार, फडणवीसांनी सस्पेन्स संपवला, म्हणाले…”
“शिखर बँकेबाबतच्या आरोपांची चौकशी करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर होती. त्या सर्व काळात राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपकडे होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्या काळात फडणवीसांनी काय केलं हे मला माहिती नाही. मोदींनी अशाप्रकारे शिखर बँकेचा उल्लेख करण्याची गरज नव्हती,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.
“मोदींनी निराशेतून असा हल्ला केला असावा. अमेरिकेचा दौरा आणि भारतातील स्थिती पाहून ते निराश झाले आणि त्या निराशेतूनच त्यांनी असा हल्ला केला असावा,” असं म्हणत शरद पवारांनी मोदींना टोला लगावला.