मुंबई | बीआरएस पक्ष महाराष्ट्रात पाय पसरत आहे. या पक्षामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला असता. त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. आज देशातील विरोधी पक्षांची बिहारच्या पाटण्यात बैठक आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे जाणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधला.
नाना पटोले म्हणाले की, “मी महाराष्ट्रात फिरतोय, काल कल्याण डोंबिवलीत होतो. भाजपचा गड असलेल्या कल्याण डोंबिवलीत आमचे तीनच सदस्य आहेत. पण तरीही काँग्रेसचं स्वागत करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले होते. आम्हाला काँग्रेसच पाहिजे, काँग्रेस संपुष्टात येणं म्हणजे लोकशाही संपुष्टात येण्यासारखं आहे, अशी लोकांची भावना आहे.”
हेही वाचा “…विरोधी पक्षांची मोर्चेबांधणी, नितीश कुमारांचा पुढाकार, आज रणनीती ठरणार? पण…”
महाराष्ट्रात १९९९ मध्ये उत्तर प्रदेशचा पक्ष आला. हैदराबादचाही आला. असे किती आले आणि गेले. आता परत हैदराबादचा पक्ष येतोय. त्याने महाराष्ट्राला काहीच फरक पडणार नाही. महाराष्ट्रातील जनता या अशा प्रलोभनांना बळी पडणार नाही. गुजरात पॅटर्न, तेलंगना पॅटर्नही लोकांना माहित आहे. तेलंगनाचा शेतकरी किती अडचणीत आहे, सामाजिक व्यवस्थेत किती बिघाड आहेत हे माहित आहे”, असं नाना पटोले म्हणाले.
“शाहु, फुले, आंबेडकरांचा विचार काँग्रेस जोपासत आहे. गेल्या ६० वर्षांत काय केलं तर, शाहु, फुले, आंबेडकरांचं विचार जोपासलं. म्हणून चहा विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान होऊ शकला, ही काँग्रेसचीच देन आहे”, असंही नाना पटोले म्हणाले.
“प्रत्येक राज्यातील भाजपाविरोधातील पक्षांची आज पाटण्यात सभा आहे. भाजपाविरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी, तीव्र चीड आहे. २०१४, २०१९ मधील आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. देश विकून देश चालवत आहेत. देशातील संवैधानिक व्यवस्था संपवत आहेत. असंही नाना पटोले म्हणाले.