नवी मुंबई | देशात ज्या ठिकाणी भाजपची ताकद नाही, त्याच ठिकाणी जातीय दंगली होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ‘महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, राज्याच्या विविध भागांतून ३,१५२ मुली बेपत्ता आहेत. यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बरी नाही,’ अशा शब्दांत पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांनी टीकास्त्र सोडले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला २४ वर्षे पूर्ण झाली असून, पक्षाचा रौप्यमहोत्सवी वर्षाचा सोहळा षण्मुखानंदमध्ये बुधवारी पार पाडला. राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी या कार्यक्रमाला हजर होते. बहुतेक नेत्यांनी शरद पवार यांच्या साडेपाच दशकांतील राजकीय प्रवासाचा दाखला देत, आगामी २०२४च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार भाषणातून बोलून दाखवला. पक्षाचे नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, सुनील तटकरे आदींची भाषणे आक्रमक होती.
केंद्रातील भाजप व राज्यातील सरकारच्या कार्यपद्धतीवर शरद पवार यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. ‘खानदेशात गेलो होतो, तेव्हा लक्षात आले की, कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आपल्या शेतात झालेला कापूस घरात साठवून ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. तीन वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करू, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते. पण, राज्यातील ३९१ शेतकऱ्यांनी गेल्या पाच महिन्यांत आत्महत्या केल्या आहेत. तर २३ जानेवारीपासून २३ मेपर्यंत राज्यातील तीन हजार १५२ महिला बेपत्ता आहेत. ही राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी चांगली गोष्ट नाही, अशी खंतही पवार यांनी व्यक्त केली.
‘सरकारमध्ये बसलेल्यांकडे लक्ष ठेवणे, हे विरोधी पक्षनेत्याचे काम आहे,’ असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार यांच्या आक्रमक भाषणानंतर म्हणाले. ‘मी गेली पाच वर्षे एक महिना प्रदेशाध्यक्ष आहे. अजित दादांनी माझे महिनेही मोजलेले आहेत. मात्र, मी सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात बुथ कमिट्या करा, असे सांगत होतो,’ असा दावा जयंत पाटील यांनी केला. अजित पवार यांच्या भाषणानंतर जयंत पाटील बोलण्यास तयार नव्हते. मात्र, शरद पवार व इतर नेत्यांनी आग्रह केल्यामुळे त्यांनी भाषण केले.