TOD Marathi

मुंबई:

ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘हर हर महादेव’ या सिनेमामुळे महाराष्ट्रात मोठा वादंग निर्माण झाला होता. या सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप करण्यात आला होता. या सिनेमाचे विविध शो राज्यभरात रद्द करण्यात आले होते. ‘हर हर महादेव’ या चित्रपटावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही आक्षेप घेतला होता. (Chhatrapati Sambhajiraje took objection on movie Har Har Mahadev) सिनेमात इतिहासाचा विपर्यास झाल्याचा त्यांचा आरोप होता. आता त्यांनी आणखी एक महत्वाची भूमिका घेतली आहे.

या वादानंतर ‘हर हर महादेव’ सिनेमा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरवर १८ डिसेंबर रोजी पाहता येणार आहे. झी मराठीवर हा सिनेमा १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता दाखवण्यात येईल. तर आता सिनेमा टीव्हीवर दाखवण्यालाही संभाजीराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवला आहे. यामुळे ‘हर हर महादेव’ सिनेमाचा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.

सदर चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करू नका अशी मागणी करणारं पत्र संभाजीराजेंनी झी स्टु़डिओजला लिहिलं आहे. (Sambhajiraje writes a letter to Zee studios) ‘हर हर महादेव’ सिनेमा टीव्हीवर प्रदर्शित झाल्यास होणाऱ्या गंभीर परिणांमांना झी स्टुडिओज जबाबदार असेल, असं त्यांनी यामध्ये म्हटलं आहे. संभाजीराजेंच्या आक्रमक पवित्र्यामुळे सिनेमाचे टीव्हीवरील प्रसारण थांबेल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सिनेमात इतिहासाचे चुकीचे सादरीकरण केल्याचा संभाजीराजेंचा आरोप या पत्रात त्यांनी आहे.

दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी याविषयी ट्वीटही केले आहे. झी स्टुडिओजला पाठवण्यात आलेले पत्र आणि झी मराठीची वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची पोस्ट शेअर करत त्यांनी असे म्हटले आहे की, ‘हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल. हर हर महादेव हा चित्रपट थिएटर मध्ये बंद पडल्यानंतर आता १८ डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे.’ (Har Har Mahadev to telecast on tv on 18th December)