TOD Marathi

ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांच्यात चांगलीच बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. (between Om Rajenimbalkar and Rana Jagjitsinha Patil in Osmanabad Collector office) शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या मुद्द्यावरुन दोघांमध्ये खडाजंगी झाली आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात ही शाब्दिक बाचाबाची झाली. बैठकीत काहीतरी संवाद सुरु असताना राणाजगजीतसिंह पाटील यांनी ओमराजेंना ‘बाळ’ असं संबोधलं. यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांना ‘मला बाळ म्हणू नको, तू तूझ्या औकातीत राहा. तुमचे संस्कार, तुमची औकात मला सगळं माहित आहे, जास्त बोलू नकोस. तुला मी बोललेलो नाही, तुझं बोलायचं कारण नाही’, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली अन् या वादावर पडदा पडला.
त्यानंतर मात्र ओम राजेनिंबाळकर यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करत त्यांची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. (Om Rajenimbalkar expressed his reaction after that matter)
ओम राजेनिंबाळकर यांची पोस्ट काय? 
जिथे मी चुकत नाही तिथे मी झुकत नाही.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा बाबतीत न्याय भेटावा म्हणून मी व माझे सहकारी आमदार कैलास पाटील व नंदुभैय्या राजेनिंबाळकर लढा देत आहोत, यामागे एकच हेतू की भरडलेल्या शेतकरी बांधवांना न्याय मिळावा. याबाबतीत समोरील आमदार ह्यांना करायचे काही नाही पण श्रेय घ्यायचे आहे. त्यांनी कितीही आटापिटा केला तरी जनता दूधखुळी नाही व ती सगळे पाहत आहे.
आज कलेक्टर कचेरीत याबाबतीत संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असताना त्या आमदाराने त्याच्या नेहमीच्या पद्धतीने विषयाला फाटा द्यावा म्हणून वैयक्तिक मला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. “सोन्याचा चमचा” घेऊन व आजूबाजू चमचे मंडळी ठेऊन त्यांना सर्वांवर रुबाब करायची सवय आहे परंतु त्यांचा सामना आज या “पवनराजे” साहेबांच्या मुलाशी झाला आणि आगीशी का खेळू नये हे आता त्याला नक्कीच कळले असेल.
यांनी संस्कार बद्दल बोलावे म्हणजे पाकिस्तान ने दहशवाद्यांविरोधात बोलावे असे आहे.
लोकशाहीत जनता हीच खरी राजा असते, आता लोकांच्या जहागिरी व जहागीरदारी दोन्ही संपल्या आहेत. तुम्ही दहशतीने आम्हाला दाबाल व आम्ही दबू असा गैरसमज आज मिटला असेल.
राजकारणात लोकांच्या साठी राजकारण करताना मी कायमच वैयक्तिक हेवेदावे टाळत असतो, आम्ही शांत असतो पण षंढ नसतो. आज समोरच्याला कळेल या भाषेत समजाविले इथून पुढेही गरज पडेल तेव्हा लोकांसाठी कोणालाही कधीही भिडायला आम्ही तयार आहोत, फक्त यांची समोरासमोर करायची नव्हे तर गुपचूप पाठीमागे करायची सवय आहे हे ही मी आणि राज्यातील जनता जाणून आहे.