राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे कृषिमंत्री मंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रीपदावरून बडतर्फ करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. (NCP delegation met Governor and demands resign of Minister Abdul Sattar) राज्य सरकारमधील एक जबाबदार पदावरील व्यक्ती महिलांविषयी असे वक्तव्य करणे हे निषेधार्ह आहे. त्यामुळे महिलांविषयी पातळीसोडून वाश्चाता करणाऱ्या व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही या भूमिकेतून पक्षाच्या शिष्टमंडळाने अब्दुल सत्तार यांना तातडीने बडतर्फ करावे अशी राज्यपालांकडे मागणी केली.
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Abdul Sattar statement on Supriya Sule) यांच्या बद्दल जे गलिच्छ वक्तव्य केलं त्यानंतर राज्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. विविध पक्षांच्या महिला नेत्यांनी देखील याबाबत त्यांची प्रतिक्रिया दिली. सोमवारी दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी निदर्शने आणि आंदोलनं करण्यात आली.
यानंतर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State president Jayant Patil) यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्र्यांना पदमुक्त करावे, अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या शिष्टमंडळात जयंत पाटील यांच्यासह माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीच्या गटनेच्या राखी जाधव, प्रवक्ते क्लाइडो क्रास्टो, नरेंद्र राणे, अदिती नलावडे, महेंद्र पानसरे, सोहेल सुभेदार, रुपेश खांडके आदी उपस्थित होते.