टिओडी मराठी, पुणे, दि. 6 मे 2021 – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष आणि संचालक मंडळ यांचा काल कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे अखिल भारतीय चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमावा, अशी मागणी बाबासाहेब पाटील यांची मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केली आहे.
या दरम्यान मागील दोन महिन्यपूर्वी राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने त्वरीत प्रशासक नेमावा, अशी मागणी कोल्हापूर धर्मादाय आयुक्त यांच्याकडे केली होती. मात्र, अद्यापही नियुक्ती संदर्भातली कोणतीही कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सांगितले कि, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ कोल्हापूरच्या शाखेशी संलग्न असलेले महाराष्ट्रातल्या कलावंताचे एक मोठं संघटन आहे. या संघटनेमध्ये सर्व प्रकारचे चित्रपट निमिर्ती संस्था, कलावंत बॅकस्टेज कलाकार आदीसह किमान 45 हजाराच्या आसपास सभासद संख्या आहे. त्यामुळे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ अतिशय प्रतिष्ठेचा आणि कलावंताच्या विश्वासाचे संघटन म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन आणि इतर संघटना अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वैचारिक भूमिकेवर मार्गक्रमण करत आहे.
तसेच दर पाच वर्षांनी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. मागील पाच वर्षात विविध आंतरिक विषयांमुळे संचालक मंडळ आणि अध्यक्ष यांच्या कारभारावर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. करोना काळातील गरजवंत कलावंताना मदत वाटपाचा मुद्दा असो किंवा इतर मुद्दे असो, आर्थिक घोळ हा नेहमी मुद्दा चर्चेत येतो. स्थानिक कलावंतांच्या प्रश्नांना बगल देऊन आर्थिक लाभापोटी अध्यक्ष आणि संचालक मंडळाने मागील पाच वर्षात केलेल्या कारभारावर अनेक सभासद असंतुष्ट आहेत. अनेकदा विविध प्रकारचे आरोप संस्थे अंतर्गत अध्यक्ष आणि संचालक मंडळ यांच्यावर झाले आहेत.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आतल्या सभासदांनी मधली एकच भूमिका समोर आली आहे ती म्हणजे या अध्यक्ष आणि संचालक मंडळ यांना आम्ही पाच वर्षे दिली असताना या पाच वर्षात अध्यक्ष आणि संचालक मंडळ यांनी कधीही कलावंत,निर्मिती संस्था, बॅकस्टेज कलाकार, यांच्या हितासाठी काम केले नाही. मग, कलावंतांसाठी ठोस अशी घरकुल योजना, किंवा कलावंताच्या आरोग्यासाठी कुठल्या प्रकारची शासकीय योजना किंवा कलावंतांसाठी असलेली मानधन योजनेत मानधन वाढविण्याकरीता केलेले पाठपुराठा व चित्रपट निर्मिती संस्था यांना सातत्याने चित्रपट अनुदानापासून वंचित का ठेवले जाते?
यावर शासन दरबारी साधी विचारांना सुद्धा कधी का केली जात नाही?, ही बाब अखिल भारतीय चित्रपट महामंडळासारखं मोठा संघटन चालवणाऱ्या अध्यक्षाच्या लक्षात का येत नाही? असे अनेक प्रश्न पडत आहेत.
मागील वर्षभरापासून करोनामुळे चित्रपट निर्माते कलावंत बॅकस्टेज कलाकार यांना उपासमारीची वेळ आलीय. अशा परिस्थितीमध्ये एक संघटन म्हणून आणि संघटनेचे पालक म्हणून अध्यक्ष तसेच संचालक मंडळाने ठोस निर्णय घेणे अपेक्षित होते, मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे सुद्धा अनेक कलावंत संचालक मंडळावर नाराज आहेत. या महामारीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना कलावंतांच्या आर्थिक स्थितीची माहिती देऊन पक्षाच्या वतीने गतवर्षी आर्थिक व अन्नधान्याची मदत मोठ्या प्रमाणात करून दिली.
जे काम अध्यक्ष म्हणून चित्रपट महामंडळाचे होतं, ते काम मात्र एका राजकीय पक्षाने केल्याने अनेक कलावंतांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष विषयी नाराजी व्यक्त केली आहे. म्हणून कार्यकाळ संपलेला असतानाही परत हेच अध्यक्ष आणि संचालक मंडळाने पुढील काळात होऊ घातलेल्या निवडणुकीपूर्वी कुठल्याही प्रकारचे गोड बंगाल करू नये, या उद्देशाने त्वरित त्यांना पदमुक्त करावे, आणि यावर धर्मदाय आयुक्त यांनी त्वरित प्रशासक नेमणूक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केली आहे.