दिल्लीः
ऐन दिवाळीत देशावर चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ (Storm in Bay of Bengal) निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ‘सीतरंग’ असं या चक्रीवादळाचं नाव असणार आहे. (Sitrang Storm) २० ते २१ ऑक्टोबरच्या दरम्यान हे चक्रीवादळ निर्माण होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोलकाता येथील हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्राने ही माहिती दिली आहे.
अंदमान समुद्र आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सोम्य चक्रीवादळ निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली असून आत्तापर्यंत हे वादळ अंदमान समुद्र परिसरात होते, अशी माहितीही हवामान विभागाने दिली आहे.
सीतारंग चक्रीवादळाचा परिणाम म्हणून येत्या २३ आणि २४ ऑक्टोबरच्या सुमारास पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. (There might be heavy rain in Maharashtra) त्यामुळे ऐन दिवाळीत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत दक्षिण-पूर्व बंगाल आणि लगतच्या भागात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, २२ ऑक्टोबरपर्यंत याचं चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यानंतर हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागाने जाहीर केलं आहे.