शिवसेना (Shivsena) कुणाची यावर सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगात कायदेशीर लढा सुरू आहे तर दुसरा लढा जमिनीवर सुरू आहे. शिवसेनेच्या इतिहासात कधी नव्हे ते पहिल्यांदा दोन दसरा मेळावे होणार आहेत. त्यामुळे ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट (Eknath Shinde) अशा दोघांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. दसरा मेळाव्याला (Dasara Melava) शिवसेनेत खूप महत्त्व आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आणि त्यानंतर दोन दसरा मेळावे होत आहेत. या दोन्ही मेळाव्यांची राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा आहे. कुणाचा मेळावा मोठा होणार? कुणाच्या मेळाव्याला अधिक गर्दी जमणार? एकंदरीत कोणाची बाजू मोठी दिसणार, भव्यदिव्य होणार? याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि म्हणून ह्या मेळाव्यांसाठी दोन्ही गटांनी मोठी ताकद पणाला लावली आहे. आम्ही मिंधे नाही तर बाळासाहेबांचे खंदे आहोत. बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray)विचार पुढे घेऊन जावे जात आहोत, अशा पद्धतीचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार करत असतात. त्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या मेळाव्यात एकनाथ शिंदे हे त्यांच्या शिवसैनिकांना याच प्रकारे भावनिक साद घालण्याची शक्यता आहे.
यासाठी शिंदे गटाचा मेळावा ज्या ठिकाणी होतोय त्या बीकेसी मैदानावर जे व्यासपीठ तयार करण्यात आलेलं आहे, त्या व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे यांचा।मोठा फोटो वापरण्यात आला आहे. त्यावर ‘गर्वसे कहो, हम हिंदू है’ ही बाळासाहेबांची घोषणा देखील आहे. मैदानात लाखाच्यावर खुर्च्या आहेत. व्यासपीठावर जाण्यासाठी असलेल्या शिड्यांजवळ काळ्या कापडात झाकून ठेवण्यात आलं आहे. संध्याकाळच्या सभेच्या वेळी हे आसन व्यासपीठावर नेण्यात येईल आणि त्या आसनावर चाफा ठेवला जाईल. एकंदरीत बाळासाहेबांना जो चाफा आवडत होता तो तिथे ठेवून आम्हीच बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहोत, असं अधोरेखित करण्याचा शिंदे गटाचा हा प्रयत्न असणार आहे.
बाळासाहेबांचं आसन ठेवण्यात आलेल्या जागेजवळ एक बॅनर देखील लावण्यात आला आहे. तिथे ‘कबुतराची नाही तर गरुडाची भरारी घ्या,’ हे बाळासाहेब यांचं वाक्य देखील आहे. शिंदे गटाच्या या मेळाव्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा, ॲनिमेशनचा देखील मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. बीकेसी मैदानात एक व्हॅनिटी व्हॅन देखील मागवण्यात आलेली आहे. त्या व्हॅनमध्ये अनेक सोयीसुविधा आहेत. त्यामुळे दोन्ही दसरा मेळावे हे हायटेक असणार आहेत आणि हाय व्होल्टेज देखील असणार आहेत.