TOD Marathi

विजयादशमी निमित्त महाराष्ट्रात होणारे दसरा मेळावे हे लक्षवेधी ठरणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची त्यांच्या त्यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणं हे निश्चितच चर्चेत राहणार आहेत. संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भाषणं एकाच वेळेवर होण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांनी देखील टिझर लॉन्च करत दसरा मेळाव्याबद्दल उत्सुकता वाढवली आहे. (Dasara Melava in Maharashtra)

मात्र, राज्यात दसरा मेळाव्यावरून अनेक चर्चा रंगल्या असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS Dasara Melava in Nagpur) यंदाच्या दसरा मेळाव्यात लक्षवेधी घडामोडी झाल्या आहेत. शताब्दी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासात ही घडामोड पहिल्यांदाच घडली आहे. कदाचित हे वर्ष आठवणीत राहावे, या उद्देशाने पहिल्यांदा ऐतिहासिक असा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतला आहे.

काँग्रेस नेत्यांसह अनेकांनी आरएसएसवर टीका करताना संघ ही पुरुष वर्चस्व असलेली संस्था असल्याची टीका केली आहे. पुरुषांचा सहभाग असल्याने संघावर अनेक राजकीय पक्षांकडून निशाणाही साधला जातो. ही प्रतिमा बदलण्यासाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पद्मश्री गिर्यारोहक संतोष यादव (Padmashri Santosh Yadav) यांना निमंत्रण दिलं आणि नागपूर येथील विजयादशमी उत्सवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना निमंत्रित केल्यानंतर त्या प्रमुख पाहुण्या म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिल्या.

आरएसएसच्या विजयादशमी कार्यक्रमात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. याबाबतचं निमंत्रण आणि माहिती देखील वेगवेगळ्या माध्यमांवर शेअर करण्यात आले होते, ज्याची मोठी चर्चा देखील झाली.

काहीही झालं तरी दसरा मेळाव्यात मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याच दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष राहील, असं बोललं जात होतं. मात्र पंकजा मुंडे (Pankaja Munde Dasara Melava Savargaon) यांनी लॉन्च केलेला टीझर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात महिला प्रमुख अतिथी याही गोष्टींनी त्यांच्या दसरा मेळाव्याकडे लक्ष वेधलेलं आहे.

संतोष यादव या गिर्यारोहक आहेत, माउंट एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला आहेत. 1993 मध्ये आणि 1994 मध्ये दोनदा त्यांनी एव्हरेस्टवर चढाई करण्यात यश मिळवलं. सन 2000 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्या इंडो तिबेट बॉर्डर पोलिसात अधिकारी देखील आहेत.