TOD Marathi

मुंबई : 
शिवसेनेतील फुटीनंतर होत असलेला यंदाच्या पहिल्या दसरा मेळाव्याची सबंध राज्यभर उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shivsena Chief Uddhav Thackery and CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील वेगवेगळ्या गटात विभागलेल्या शिवसैनिकांमध्येही या मेळाव्याबाबत मोठा उत्साह आहे. मात्र या सगळ्या गोष्टी सुरु असताना ठाकरे समर्थक शिवसैनिकांना मुंबई पोलिसांच्या एका निर्णयाने धक्का बसला आहे.आजवर दरवर्षी ५०० ते ६०० शिवसैनिक दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मातोश्री ते शिवाजी पार्कपर्यंत पायी जातात. या शिवसैनिकांचे नेतृत्व वरळी विभागाचे उपविभाग प्रमुख अरविंद भोसले करतात.
मात्र यंदा शिंदे गटाचा दसरा मेळावा हा याच मार्गावरून बीकेसी मैदानाच्या (Shinde group Dasara Melava in BKC ground Mumbai) दिशेने प्रस्तान करणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न (Law and order situation in Mumbai) उद्भवू शकतो. आणि म्हणून मुंबई पोलिसांनी या सर्व शिवसैनिकांना मातोश्री ते दादरपर्यंत जाण्यास परवानगी नाकारली आहे.मुंबई पोलिसांनी अरविंद भोसले यांना पत्र लिहून कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अशी परवानगी देता येणार नाही, असं सांगितलं आहे. दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कात होणार आहे तर शिंदे गटाची सभा बीकेसी येथील मैदानात पार पडणार आहे. या सभांमध्ये शक्तिप्रदर्शनासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यादिवशी होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. बीकेसी येथे होणाऱ्या सभेत राज्यभरातून साधारणतः तीन हजार बसमधून कार्यकर्ते सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या बसच्या पार्किंगसाठी विद्यापीठातील जागा उपलब्ध व्हावी, अशी विनंती करणारे पत्रही मुंबई महापालिकेच्या पूर्व विभागाच्या सहाय्यक अभियंतांनी पाठविले होते. विद्यापीठाने कलिना संकुलातील शारीरिक शिक्षण भवन जवळील मैदान, एआयटीए येथील मोकळी जागा आणि विद्यानगरी उत्तरद्वाराजवळील मोकळी जागा उपलब्ध करून दिली आहे. ही जागा उपलब्ध करून देत असताना विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण होणार नाही, विद्यापीठाच्या मैदानांचे नुकसान होणार नाही अशा विविध अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.