प्रभादेवीमध्ये मध्यरात्री शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला. पोलिसांनी पाच शिवसैनिकांना अटक केली आहे. त्यानंतर शिवसेना नेते आणि शिवसैनिकांनी दादर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सावंत यांनी केली. सत्ताधाऱ्यांकडून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोळीबार करणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा आणि शिवसैनिकांविरोधातील कलम 395 नुसार गु्न्हे मागे घेईपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत. सरकारची गुंडगिरी सुरू राहिल्यास जुनी शिवसेना दाखवून देऊ असा इशारा खासदार अरविंद सावंत यांनी दिला आहे.
गणेश विसर्जनादरम्यान शिवसेना आणि शिंदे गटात तणाव निर्माण झाला होता. मध्यरात्री दोन्ही गटात हाणामारी झाली. पोलिसांनी शिंदे गटाच्या तक्रारीनंतर महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत आणि इतर दोघांना अटक केली. त्यानंतर आज सकाळपासून शिवसेना नेते आणि शिवसैनिकांनी दादर पोलीस स्टेशनबाहेर जमू लागले. शिंदे गटाविरोधात आणि गोळीबार करणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात का आला नाही, असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी दादर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना केला.
सावंत यांच्यासह दादर पोलीस ठाण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, आमदार अॅड. अनिल परब (Adv. Anil Parab), आमदार सचिन अहिर(Sachin Ahir), माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar), विशाखा राऊत (Visakha Raut), मिलिंद वैद्य (Milind Vaidya) यांनी धाव घेतली
माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी म्हटले की, आमदार सदा सरवणकर यांच्याकडील पिस्तूलमधून गोळीबार झाला. मात्र, ‘चोराच्या उलट्या बोंबा’ या म्हणी प्रमाणे तक्रार दाखल करायला आलेल्या आमच्या शिवसैनिकांविरोधात गुन्हे दाखल झाले. सत्ताधाऱ्यांची ही गुंडागर्दी सहन केली जाणार नाही. गोळीबार करणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. शिवसैनिकांविरोधात दाखल करण्यात आलेला 395 अंतर्गत गुन्हा रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली. पोलिसांवर दबाव असल्याचेही त्यांनी सांगितले.
सत्ताधारी कायदा-सुव्यवस्था बिघडवत आहेत
राज्यकर्ते असलेल्या लोकांकडून चुन चुन के मारेंगेची धमकी दिली जाते, विरोधकांना संपवण्याची भाषा केली जाते. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचा आरोप सावंत यांनी केला. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसैनिक शांत आहेत. राज्यातील वातावरण बिघडू नये आम्हाला वाटते. मात्र, ही गुंडागर्दी सुरू राहिल्यास आम्ही जुनी शिवसेना काय आहे, ते दाखवून देऊ असा इशाराही सावंत यांनी दिला. आमदार सदा सरवणकर यांनी प्रभादेवी आणि दादर पोलीस ठाणे परिसरात गोळीबार केला असल्याची जबाब पोलिसांने दिला आहे. मात्र, त्यानंतरही कारवाई नाही. गृहमंत्री नेमकं काय करत आहेत, असा सवालही त्यांनी केला.