भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात, विशेषता भाजपच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून होती. यामध्ये आशिष शेलार यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे या नेत्यांचेही नाव चर्चेत होतं. शेवटी पक्षाने आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. (Chandrashekhar Bawankule is the New State President of BJP)
कोण आहेत चंद्रशेखर बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर जिल्ह्याच्या कामठी विधानसभा मतदारसंघाचे तीनदा आमदार राहिले आहेत. सध्या ते विधान परिषदेवर आहेत. 2014 ते 19 दरम्यान ते राज्याचे ऊर्जामंत्री होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये बावनकुळे यांचं तिकीट भाजपकडून कापण्यात आलं होतं. त्यानंतरही पक्षाशी प्रामाणिक राहत बावनकुळे यांनी स्वतःला पक्ष संघटनेत झोकुन दिलं होतं. त्यानंतर पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. मूळचे नागपूर जिल्ह्यातील असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचे देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी (Nitin Gadkari) या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांशी देखील अतिशय चांगले संबंध आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नियुक्तीसह मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आशिष शेलार (Ashish Shelar Appointed as Mumbai BJP President) यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील दोन्ही नेत्यांची निवड अध्यक्षपदी करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षाची सूत्र ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडेच आहेत, हे स्पष्ट होतं.