TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 12 मे 2021 – फरीदकोटच्या गुरू गोविंद सिंह वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये पाठविण्यात आलेले 80 व्हेंटिलेटर्स पैकी 71 खराब निघाले आहेत. हे व्हेंटिलेटर्स AgVa Healthcare द्वारे ‘पीएम केअर्स’ फंड अंतर्गत प्रदान केले होते. फरीदकोटच्या मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यावरून मोदी सरकारने कोरोना काळात किती प्रमाणात गंभीर होऊन लोकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला आहे, हे यावरून समजत आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, या व्हेंटिलेटर्सची गुणवत्ता खराब असून याचा वापर सुरू असताना एक-दोन तासांत ते बंद पडत आहेत.

मोदी सरकारच्या ‘पीएम केअर्स’ फंडातून मागण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मागील वर्षी ‘पीएम केअर्स’ फंडातून पंजाबमध्ये उपलब्ध करून दिलेले व्हेंटिलेटर्स उपयोगात आणले जात नाही, असे बोलले जात होते. त्यामागेही गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित झाला होता. हे व्हेंटिलेटर्स काही काळ चालल्यानंतर बंद पडत होते, असे असं सांगितले जात आहे.

याबाबत अनेस्थेसिस्ट्स यांचे म्हणणं असं आहे की, केंद्र सरकारकडून पाठविलेल्या या व्हेंटिलेटर्सवर विश्वास ठेवता येणार नाही, कारण, हि मशिन वापरत असताना काही तासात अचानक बंद पडत आहेत. एक डॉक्टर म्हणाले की, यांची गुणवत्ता खराब आहे, ते केव्हाही बंद पडतात. अशावेळी ही मशिन वापरून रुग्णांचा जीव आम्ही धोक्यात घालू शकत नाही.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की फरीदकोट वैद्यकीय महाविद्यालयात 39 व्हेंटिलेटर होते, त्यापैकी 32 वापरात होते. मात्र कोविड काळात 300 रुग्ण दाखल झाले आणि त्या तुलनेत व्हेंटिलेटर्स खूपच कमी होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, मागील वर्षी 250 व्हेंटिलेटर्स पाठविले होते, ज्याची किंमत 25 कोटी रुपयांहून अधिक होती. अजूनही यापैकी बरीच मशिन केवळ गुणवत्तेच्या अभावामुळे पडून आहेत. तसंच पंजाबमध्ये तंत्रज्ञांचीही कमी आहे.

दरम्यान, पंजाबच्या मुख्य सचिव यांनी या खराब व्हेंटिलेटर्सच्या दुरुस्ती करण्यासाठी परवानगी दिलीय. याकरिता तंत्रज्ञ आज दाखल होण्याची शक्यता आहे. हे व्हेंटिलेटर्स दुरुस्त करून पुन्हा वापरात आणण्यात येतील. तोपर्यंत तात्काळ 10 नवे व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत.