टिओडी मराठी, मुंबई, दि. 27 जुलै 2021 – गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी महापूर स्थिती निर्माण झाली. तसेच दरड कोसळल्यामुळे राज्यातील 8 जिल्ह्यामध्ये सुमारे 6 हजार कोटींचं नुकसान झाले आहे, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना पॅकेजच्या रुपाने भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्यात.
महारष्ट्र राज्यातील 8 जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी अंदाजे 6 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. पुरामुळे कोकणातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भातील अकोला आणि अमरावतीत मोठं नुकसान झालंय.
एकूण 6 हजार कोटींचे हे नुकसान झाले आहे, असा सरकारचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे पिकांची नुकसान भरपाई, रस्ते, वाहून गेलेल्या पुलांची बांधणी, कोलमडलेली वीज यंत्रणा उभी करणे, दरडी कोसळलेल्या गावांचं पुनर्वसन, लोकांना मदत आदींसाठी पॅकेज देण्याकरिता सरकारने हालचाली सुरू केल्यात.
याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील पूरस्थिती आणि नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहेत. तसेच राज्याचे पुरामुळे झालेलं नुकसान आणि पूरग्रस्तांना द्यावयाची मदत यावर चर्चा करणार आहेत.
राज्य मंत्रिमंडळाची उद्या बुधवारी बैठक होणार आहे. यावेळी राज्यातील पूरस्थिती आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा होणार आहे. तसेच उद्या पूरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करणार आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत जाहीर केलीय. कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुराने थैमान घातलंय.
या भागांत अत्यंत बिकट परिस्थिती आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. दरडग्रस्तांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.