TOD Marathi

टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 8 मे 2021 – एमपीएससीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे 2,185 उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र द्यावीत, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केलीय.

या मागणी पत्रामध्ये चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, मराठा आरक्षण कायदा अंमलात असताना राज्यसेवा मुख्य परीक्षेची जाहिरात, पूर्व परीक्षा, मुलाखत, परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिफारस हे सर्व टप्पे पूर्ण झालेले आहेत.

याच काळात 9 सप्टेंबर 2020 पूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये विविध विभागांच्या भरतीप्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. परंतु शासनाने कोरोना या एकाच कारणास्तव पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती पत्रक दिलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे 2 हजार 185 उमेदवारांची काहीही चूक नसताना त्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागतोय.

त्याचबरोबर 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय संविधान पीठाने दिलेल्या अंतिम निकालात 9 सप्टेंबर 2020 पूर्वी पूर्ण झालेले सर्व शैक्षणिक प्रवेश आणि भरती प्रक्रिया या अबाधित राहतील, असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.

सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन आहे, बेरोजगारी अशा परीस्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यास करून कष्टातून यश मिळवून हि त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. पात्र उमेदवारांना आपल्या भविष्याची चिंता लागलेली आहे. या नियुक्तीबाबत त्यांच्या तीव्र भावना आहेत.

उच्चशिक्षित असून हि बेरोजगार असण्याची एक प्रकारची नकारात्मक भावना वाढत आहे. शेतकरी आत्महत्येनंतर आता सुशिक्षित बेरोजगार म्हणून आत्महत्ये सारखे टोकाचे पाउल उचलण्याची त्यांची मनस्थिती बनत आहे. असे विविध विद्यार्थी मराठा संघटना याबाबत निवेदन सादर करीत आहेत.

मुख्यमंत्री या नात्याने 2 हजार 185 उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आपण गांभीर्यपूर्ण विचार करून उमेदवारांना नियुक्ती पत्र लवकर द्यावीत, अशी मागणी आज भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इ-मेल द्वारे केलीय.