TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 16 मे 2021 – सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला सुमारे 100 ते 125 दुचाकींची रॅली काढल्याचा धक्कादायक प्रकार धनकवडी ते कात्रज स्मशानभुमी परिसरात घडला. याप्रकरणी 150 ते 200 जणांविरूद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हरिश्‍चंद्र वेैंजळे यांनी फिर्याद दिलीय. कोरोनामुळे लॉकडाऊन, कडक निर्बध असे नियम लागू केले आहेत. असे असताना सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला 125 दुचाकींची रॅली काढण्यात आली. म्हणून हा विषय चर्चेचा आणि कोरोना नियमांचं उल्लंघन करणारा ठरला.

सिद्धार्थ पलंगे, कुणाल चव्हाण, सुनील खाटपे, अमित खाटपे, सौरभ भगत, राजकुमार परदेशी, ऋषीकेश भगत, गणेश फाळके यांच्यासह साथीदारांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. माधव हनुमंत वाघाटे या सराईताच्या अंत्यविधीला दुचाकी रॅली काढली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका टोळक्‍याने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याचा खून केला होता. त्यानंतर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याच्यावर कात्रज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार होते. त्याच्या अंत्यविधीसाठी सुमारे 150 ते 200 जणांनी दुचाकीवरून रॅली काढली.

टोळक्‍याने बालाजीनगर ते धनकवडी आणि कात्रज स्मशानभूमीपर्यंत विनापरवानगी रॅली काढून शांततेचा भंग केला. तसेच कोरोनाच्या पाश्वभूमीवर मिरवणूक आणि रॅली काढण्यास बंदी असतानाही, टोळक्‍याने अशा प्रकारे रॅली काढल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे.

‘कोरोना नियमावलीचे आदेश झुगारून अंत्यविधीला सुमारे 100 ते 125 जणांनी दुचाकी रॅली काढल्याचे दिसून आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील दुचाकींचे क्रमांक शोधून आरोपींचा शोध घेतला जात आहे, असे सहकानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. एस. खेंगरे यांनी सांगितले आहे.