TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 18 ऑगस्ट 2021 – सध्या तालिबान दहशतवाद्यांनी अफगाणिस्तान देशावर कब्जा केला आहे. त्यामुळे तेथील नेते देश सोडून पळाले आहेत. तर, नागरिक देखील भयभीत झाले असून तेही देश सोडून पळत आहेत. तालिबानने तेथील लोकांवर अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे महिलांचे हक्क आणि त्यांचे संरक्षण याविषयी जागतिक स्तरावरून चिंता व्यक्त केली जात आहे. अशावेळी भारतीय स्वातंत्र्यलढ्याची तुलना तालिबानशी केल्यामुळे उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रेहमान बर्क यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहेत. या प्रकरणी संबंधित खासदार आणि इतर दोघांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

तालिबानने काबूलवर आपला अंमल प्रस्थापित केल्यानंतर अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्याचे स्पष्ट झालं आहे. या घटनेवर पाकिस्तान, चीन आणि रशियाने अनुकूल प्रतिक्रिया दिलेली असताना जगात तालिबान्यांचा निषेध केला जातोय.

मात्र, उत्तर प्रदेशच्या संभल मतगारसंघातील समाजवादी पक्षाचे लोकसभेतील ज्येष्ठ खासदार शफीकुर रेहमान बर्क यांनी तालिबान्यांच्या कृतीचं समर्थन करत त्यांची तुलना भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी केलीय.

जेव्हा भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, तेव्हा संपूर्ण देश स्वातंत्र्यासाठी लढला होता. त्यांना स्वतंत्र व्हायचे आहे. ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. आपण त्यात हस्तक्षेप कसा करू शकतो?, असे खासदार शफीकुर रेहमान म्हणाले होते.

अफगाणी लोकांना त्यांचा स्वत:चा देश त्यांना हवा तसा चालवायचा आहे. तालिबानी संघटनांनी रशिया आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांनाही अफगाणिस्तानमध्ये स्थिरावू दिलं नाही. आता त्यांना त्यांचा देश स्वत: चालवायचा आहे, असे शफीकुर रेहमान बर्क म्हणाले होते.

त्यांच्या या विधानावरून आता टीका केली जात आहे. या विधानासाठी त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यासोबत समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते मुकीम आणि फैझान यांच्याविरोधात ही तालिबानला अनुकूल भूमिका घेतल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे.

भाजपाने दाखल केली तक्रार –
खासदार शफीकुर रेहमान बर्क यांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम १२४ अ (देशद्रोह) नुसार गुन्हा दाखल केला आहे. भाजपाचे उत्तर प्रदेशमधील नेते राजश सिंघल यांनी शफीकुर रेहमान यांच्याविरोधात मंगळवारी तक्रार दाखल केली आहे, असे पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांनी सांगितले आहे.

खासदार शफीकुर रेहमान बर्क यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. मी असं कोणतंही (भारतीय स्वातंत्र्य लढ्याची तालिबानशी तुलना) वक्तव्य केलं नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. मी भारताचा नागरिक आहे, अफगाणिस्तानचा नाही. त्यामुळे तिथे काय घडतंय?, याच्याशी मला काहीही देणं-घेणं नाही. मी माझ्या सरकारच्या धोरणांचे समर्थन करतो, असे स्पष्टीकरण शफीकुर रेहमान यांनी दिलं आहे.

योगी आदित्यनाथ यांची टीका –
शफीकुर रेहमान यांच्या वक्तव्यानंतर खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही त्यांच्यावर परखड शब्दांत टीका केली होती. ते निर्लज्जपणे तालिबानचं समर्थन करत होते. याचा अर्थ तालिबान्यांच्या रानटी कारवायांचं समर्थन करत होते.

आपण एक संसदीय लोकशाही आहोत. कुठे चाललोय आपण? मानवतेवर कलंक असणाऱ्या लोकांचं आपण समर्थन करायला लागलोय, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी शफीकुर रेहमान यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.