TOD Marathi

Mahabaleshwar ला दिवसात 1054 पर्यटकांनी दिली भेट; आजपासून बाजारपेठ सुरु, पर्यटकांची Antigen Test करणार

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, सातारा, दि. 21 जून 2021 – महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर आजपासून पर्यटकांसाठी खुले झाले आहे. नगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात 1054 पर्यटकांनी भेट दिली आहे. तसेच महाबळेश्वरची बाजारपेठ ही सोमवारपासून (दि. 21) सुरू होणार आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनासोबत पर्यटकांना महाबळेश्वरच्या खास बाजारपेठेत खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. मात्र, पर्यटकांची जागोजागी अयोग्य तपासणी केली जाणार आहे.

यानंतर कोणत्याही क्षणी पॉइंट्सही पर्यटकांसाठी खुले करण्याचे आदेश येणार असल्याची शक्यता गृहीत धरून दोन दिवसांत सर्व पॉइंट्सची स्वच्छता आणि सुरक्षेचा आढावा घेण्याचा निर्णय वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेतला आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लागू केलेले नियम शिथिल करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाहीर केलाय. त्यामुळे साडेतीन महिन्यांनंतर महाबळेश्वर पर्यटकांसाठी खुले झाले आहे. पहिल्या दिवशी रविवारी 1054 पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटला आहे.

पावसाळ्यात येणारे पर्यटक हे पॉइंट पाहण्यासाठी नव्हे, तर पावसात मनसोक्त भिजण्यासाठी आणि डोंगरावरून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी येत असतात. आता उद्यापासून अशा हौशी पर्यकांची गर्दी होण्यास सुरुवात होणार आहे, हे आज आलेल्या पर्यटकांच्या संख्येवरून समजत आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळ्यामध्ये महाबळेश्वरमधील अनेक पॉइंट बंद राहतात. परंतु, शहराजवळ आणि पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित असलेले काही पॉइंट हे वन विभागाच्या ताब्यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे इथल्या प्रसिद्ध वेण्णालेक हा पालिकेच्या ताब्यात आहे.

वन विभागाच्या ताब्यात असलेल्या पॉइंट्सपैकी केट्स पॉइंट, विल्सन पॉइंट, लॉडविक पॉइंट, मुंबई पॉइंट आणि प्रसिद्ध लिंगमळा धबधबा हे पॉइंट पर्यटकांसाठी सुरू करणार आहेत. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून मिळण्याची शक्यता वर्तविली आहे.

तत्पूर्वी सर्व पावसाळी पॉइंट्सच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी आज वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील हिरडा विश्रामगृहावर संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष आणि सचिव आणि महासमितीचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व पॉइंट्सची स्वच्छता करून पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचा आढावा दोन दिवसांत घेतला जाणार आहे.

या बैठकीला संयुक्त वन व्यवस्थापन महासमितीचे अध्यक्ष विजय भिलारे, सचिव एल. डी. राऊत, तानाजी केळगणे, संजय कमलेकर, अनिल केळगणे, रमेश चोरमले, पंढरीनाथ लांगी, विलास मोरे, नाना वाडेकर, संजय केळगणे, धनंजय केळगणे, संदिप भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्यटकांची करणार ऍण्टीजेन टेस्ट :
महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांची पाचगणी येथील दांडेघर नाक्यावर रॅपिड ऍण्टीजेन टेस्ट केली जाणार आहे. तसेच नाक्यावर आलेल्या पर्यटकांची ऑक्सिजन लेवल तपासण्यात येणार आहे.

तसेच टेम्परेचर देखील तपासले जाणार आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यात हुल्लडबाजी होऊ नये, म्हणून सुरक्षागार्ड नेमण्यात येणार आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाणे सर्व पॉइंट्स वेळेत बंद केले जाणार आहेत.