TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 26 मे 2021 – शिवसेनेने भाजपला आणखी मोठा झटका दिला आहे. जळगावातील मुक्ताई नगरपालिकेचे 10 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यामुळे भाजपाला खिंडार पडले आहे. जळगाव महानगरपालिकेनंतर आता मुक्ताई नगरपालिकेतील नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपला हा एक मोठा झटका बसला आहे.

मुक्ताई पालिकेचे 10 नगरसेवक हे गुलाबराव पाटील यांच्यासह ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या 10 नगरसेवकांनी हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

काही दिवसांपूर्वी जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचे तब्बल 30 नगरसेवक आपल्या गळाला लावले. भाजपला हा एक मोठा झटका बसला होता. हे नगरसेवक शिवसेनेच्या तंबूत गेल्याने फुटीर नगरसेवकांना व्हीप न बाजवता आल्याने भाजपने न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, औरंगाबाद खंडपीठाने भाजपची ही याचिका फेटाळून लावली होती.

जळगावच्या या घटनेतून भाजप सावरत ना सावरत तितक्यात आता मुक्ताई नगरपालिकेचे 10 नगरसेवक शिवसेनेत दाखल झालेत. त्यामुळे आता मुक्ताई पालिकाही भाजपच्या हातातून जाणार? असे चित्र निर्माण झाले आहे.