टिओडी मराठी, दि. 17 जून 2021 – भारत बायोटेकने करोना प्रतिबंधासाठी तयार केलेल्या पहिल्या स्वदेशी कोवॅक्सिन लसीमध्ये गाईच्या बछड्याच्या रक्तातील पातळ द्रव अर्थात सिरम चा वापर केला आहे, याच्या खुलाशानंतर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरणे, हा राजकीय डावपेचाचा भाग आहे, असे मत वैद्यानिकांनी व्यक्त केलं आहे.
याबाबत संशोधकांनी असा खुलासा केलाय की, जेव्हा एखाद्या विषाणू विरुद्ध लस तयार केली जाते, तेव्हा प्राथमिक पातळीवर घोडे. रेडे, म्हशी अथवा अन्य प्राण्यांच्या सिरमचा वापर मागील कित्येक दशके सर्व देशातून केला जातोय. मेडिकल सायन्समध्ये ही प्रथा खूप जुनी आहे. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ञ, देशामध्ये कोवॅक्सिनवरून सुरु झालेल्या वादाने हैराण झालेत.
कसौली सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूटचे माजी प्रमुख प्रो. राकेश सहगल याबाबत बोलताना म्हणाले, कोणतीही लस तयार करण्यासाठी अगोदर पेशी तयार कराव्या लागत असतात. त्याला सेल्स लाईन संबोधतात.
या पेशी वाढविण्यासाठी सिरमची गरज असते आणि ते प्राण्यांमधून घेतले जाते. ज्या पेशींची न्युट्रिशनल व्हॅल्यु अधिक असेल अशा पेशी यासाठी लागत असतात. तसेच त्या पेशी प्राण्यांमध्ये अधिक असतात.
पोलिओ, रेबीज सारख्या लस तयार करताना सुद्धा प्राण्याच्या सिरमचा वापर केला आहे. कारण, यातून सुरक्षित लस तयार केली जाते. अंतिम प्रक्रियेत म्हणजे जेव्हा लसचे मोठे उत्पादन सुरु करण्याची वेळ येते तेव्हा त्यात कुठलेच सिरम शिल्लक राहत नाही. कारण, सिरम शिल्लक राहिले तर लस तयार होऊ शकत नाही.
सिरमचा वापर करण्याआधी ते पाणी, रसायने वापरून स्वच्छ केले जाते. त्यानंतर तयार केलेल्या पेशीत विषाणू संक्रमित केला जातो. त्यावर तयार केलेल्या औषधाच्या चाचण्या करतात आणि लस तयार होते, असे त्यांनी सांगितले.