TOD Marathi

आज World Blood Donor Day ; जाणून घ्या, रक्तदानाबद्दल ‘या’ बाबी, कोणी रक्तदान करावे आणि कोणी करू नये

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, मुंबई, दि. 14 जून 2021 – आज 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. जगात 14 जून हा दिवस साजरा केला जातो आणि याबाबत ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ अशा वाक्यांनी जनजागृती केली जाते. रक्तदानामुळे मनुष्याचा जीव वाचतो. आता तर प्रगत तंत्रज्ञानामुळे रक्तातल्या वेगवेगळ्या घटकांचाही वेगवेगळ्या रुग्णांकरिता वापर करणं शक्य होतंय.

रक्तदानाबद्दलची जागरूकता निर्माण करण्यासाठी 14 जून हा जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातोय. या दिवसाच्या निमित्ताने रक्तदानसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊया.

सर्वसाधारणपणे एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे 5 लिटर रक्त असतं. रक्तदान करताना त्यातील केवळ 450 मिलिलीटर रक्त काढून घेतलं जातं. तेवढं रक्त संबंधित व्यक्तीच्या शरीरामध्ये पुन्हा 24 ते 48 तासात तयार होतं. म्हणून रक्तदान करणारी व्यक्ती निरोगी व 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची असणे गरजेचं आहे. पुरुषांना दर तीन महिन्यांनी आणि स्त्रियांना दर चार महिन्यांनी रक्तदान करता येतं.

रक्तदान केल्यानंतर काही जणांना थकवा जाणवतो. त्यामुळे रक्तदानानंतर लगेच कडक उन्हात जाऊ नये, भरपूर पाणी प्यावं, फळं खावीत, ज्यूस प्यावा, पौष्टिक आहार घ्यावा. रक्तदानाच्या 24 तास आधी व्यसन, धूम्रपान करू नये. तसेच रक्तदानानंतरही किमान ३ तास धूम्रपान करू नये.

ह्यांनी रक्तदान करू नये :
एचआयव्ही, हिपॅटायटिस, सिफिलीस, टीबी अशा दुर्धर व्याधींनी ग्रस्त असलेल्या व्यक्ती रक्तदान करू शकत नाहीत. तसेच कोणताही गंभीर आजार झाला असेल, तर त्यातून पूर्ण बरं झाल्यानंतर 14 दिवसांपर्यंत रक्तदान करू नये. वेश्याव्यवसाय करणाऱ्यांना रक्तदान करता येत नाही.

गर्भवती महिला किंवा नुकताच बाळाला जन्म दिलेल्या महिला किंवा नुकताच गर्भपात झालेल्या महिला ६ महिने ते वर्षभरापर्यंत रक्तदान करू शकत नाहीत. त्यांच्या शरीरातल्या लोहाची झीज झालेली असते. त्यामुळे हिमोग्लोबीनची तपासणी केल्यानंतरच त्यांना रक्तदान करता येतं. दातांवर उपचार केल्यानंतर 24 तासांपर्यंत, तसेच टॅटू काढल्यानंतर ६ तासांपर्यंत रक्तदान करू नये, असा सल्ला दिला जातो.