टिओडी मराठी, दि. 7 जुलै 2021 – दरवर्षी आषाढी आणि एकादशीला वारकरी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जातात. विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन वारकरी पंढरीची वाट चालतात. हि वारकरी परंपरा अनेक वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रात आहे. अनेक संतांनीही विठुरायाच्या नामस्मरणात पंढरपूर गाठले आहे. वारीसाठी देश -प्रदेशातून नव्हे तर विदेशातूनही लोकं येतात. सहभागी होतात आणि विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन होतात. मात्र, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना … वारी नेमकी आळंदी ते पंढरपूर अशीच का असते ? किंवा याच मार्गावर का असते ? याबाबत आपण जाणून घेऊया. आळंदीचे महत्व अधिक का आहे? तर, आळंदीला ‘गुरूपीठ’ मानलं जातं. गुरूसोबत देवाकडे जाणे याला अधिक महत्व आहे.
संतानी आपल्याला दाखवलेलं देवतेचं स्थान म्हणजे पंढरपूर. समाजाला योग्य भक्ती मार्गाला लावण्यासाठी सगुण, उत्तम देवतांच्या स्वरूपाची गरज असते. तर असं व्यापक, सर्वसामावेशक सहज लोकांना आवडेल, असं स्वरूप कोणतं रूप असेल तर ते आहे श्रीकृष्णाचे.
महाराष्ट्र राज्यात ज्ञानेश्वर महाराज यांच्या अगोदर वारीची परंपरा चालूच होती. पण, या परंपरेला व्यापक रूप देण्यासाठी माऊलींनी यात्रेचा प्रयोगाला प्रारंभ केला होता. समाजाला भक्ती मार्गाला लावण्यासाठी विविध उपक्रम केले. यात शारीरीक, वाचिक तसेच मानसिक उपक्रमाचा देखील सामावेश आहे. वेगवेगळ्या तीर्थक्षेत्र, ठिकाणावरून दिंड्या पंढरपूर येथे येतात.
आपल्याकडे वैष्णव, भागवत संप्रदायात जितके संत झालेत. संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोराकुंभार, संत एकनाथ महाराज आणि अन्य संतानी आपापल्या गाथ्यांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींना गुरूतुल्य मानले आहे. आणि त्यांची स्तुती केली आहे. म्हणून ज्या प्रकारे पंढरपूरला ‘देवपीठ’ मानले तसे आळंदीला ‘गुरूपीठ’ मानलं जातं
आजही आळंदी इथं ज्ञानदानाचे कार्य सुरु आहे. गुरूंच्या, संताच्या सोबत देवाकडे आपण जात असतो. त्यावेळेस देव आपले सगळे दोष दुर्लक्षित करून आपल्याला अलिंगन देतो, आपलसं करतो म्हणून संतांच्या पालखी सोबत जाण्याला जास्त महत्वाचं मानलं जात आहे.
आजही आळंदीमध्ये सिध्देश्वर भगवानाचा कळस हलतो अन वारीला निघण्याचा संकेत मिळतो. म्हणून आळंदीला विशेष असं महत्व प्राप्त आहे. संत नामदेव महाराज यांनी आपल्या गाथ्यामध्ये ‘आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव , देवताचे नाव सिध्देश्वर’ तर आळंदीचा मूळ शिवपीठ म्हणून नामदेव महाराज यांच्या गाथ्यात उल्लेख आहे.
आपल्या संतानी दिलेली दूरदृष्टी म्हणजे ‘हरी आणि हर’ या दोघांमधला अभेद ही दिलेली अफाट दूरदृष्टी आहे. ‘हरी हरा मानू नका भेद ‘ हा संताचा उपदेश आहे. हरी आणि हर भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्यात भेद मानू नये. ते असं म्हणत नाहीत के ते दोघे समान आहेत, ते असं म्हणतात कि हे दोघे अभिन्न आहेत.
शिवपीठापासून ते विष्णूपीठापर्यंत म्हणजे आळंदीपासून पंढरपूरपर्यंत अशी वारीची प्रथा, परंपरा आहे. त्यामुळे सर्वांगीन दृष्ट्या वारीची अशी एक परंपरा म्हणून आळंदी ते पंढरपूर वारी केली जाते. तसेच दुस-या ठिकाणावरून वारी केली जाते पण, आळंदीला अधिक महत्व आणि मानाचं स्थान आहे. म्हणून वारी आळंदीहून पंढरपूरला माऊलींसोबत जाते.