TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 3 मे 2021 – ‘काही मोठे नेते माझ्यावर दबाव आणत आहेत. मी जर बोललो तर माझा शिरच्छेद होईल’ असा खुलासा सीरम इन्स्टीट्यूटचे अदर पूनावाला यांनी केले होता. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत या संदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये नाना पटोले म्हणाले की, अदर पूनावाला यांनी म्हटल्यानुसार त्यांना लसीच्या पुरवठ्यासाठी धमक्या मिळत आहेत. धमकी देणाऱ्यांची नावं त्यांनी उघड करायला हवीत. काँग्रेस पक्ष त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास तयार आहे.

देशात करोनाचे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीने करोना लसीकरण मोहिम सुरू केलीय. मात्र, अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण मोहिम रखडतेय. त्यात लस निर्माता कंपनी सीरम इन्स्टीट्यूटचे अदर पूनावाला यांनी आपल्याला धमक्या मिळत आहेत, असे सांगत सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी लंडनला गेले आहेत. यावरून आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात राजकारण सुरु आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अदर पुनावाला यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. पुनावाला देशात नसताना आणि त्यांनी सुरक्षा व्यवस्था मागितलेली नसताना केंद्राने त्यांना सुरक्षा का पुरवली? असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.

केंद्राने पुनावाला यांना सुरक्षा पुरवण्यामागे नेमका काय खेळ आहे? असा सवाल ही त्यांनी केला आहे. अदर पुनावाला यांनी आपण भारतात परतणार नसून तिथं आपल्या जीवाला धोका आहे, असं सांगितलं होतं. पण, आता आपण भारतात परत येत आहोत, असं त्यांचं वक्तव्य पाहायला मिळतय. त्यांच्या या निर्णयाचं काँग्रेस स्वागत केलं आहे.