पणजी: शिवसेना खासदार संजय राऊत हे गोव्याच्या दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी सतत पक्ष बदलत राहणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. आम्ही निर्लज्ज लोकांना पक्षात घेत नाहीत, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. गोव्यात आम्ही स्वबळावर लढणार आहोत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
आमच्याकडे निर्लज्ज येत नाही. निर्लज्जांना शक्यतो आम्ही घेत नाही. निर्लज्ज राजकारणी म्हणालो. एका पक्षातून निवडून यायचं आणि दुसऱ्या पक्षात जायचं हे सध्या गोव्यात सुरू आहे. त्यामुळे मी हे म्हणत आहे. गोव्याला एक परंपरा आहे. गोव्यात अनेक चांगले राजकारणी झाले. पण अलिकडे गोव्याचं राजकारण निर्लज्जतेच्या पातळीवर गेलं आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
गोव्यात इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारण्याचे राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहेत. प्रत्येक वेळेला निवडणूक आली की नवीन नवीन पर्याय उभे राहतात. तसे नवीन पर्याय आता उभे केले जात आहेत. आनंद आहे. मात्र, शेवटी गोवेकरांच्या मनात असेल तेच होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.